पुणे: गाड्यांच्या किमतीत जवळपास दुपटीने झालेली वाढ, डिझेलसह टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य आवश्यक गोष्टींच्या वाढलेल्या किमती, टोल व करांमध्ये झालेली वाढ यामुळे बस आणि कारच्या भाडेदरात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे आणि सचिव तुषार जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेली पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन ही पुणे शहरातील एक महत्त्वाची संघटना असून, आमच्या संघटनेचे सुमारे १४०० सभासद आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या बस वाहतूक दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
मात्र, या कालावधीत वाहनांच्या किमती, टायर्स, स्पेअर पार्ट्स, देखभाल-दुरुस्ती, चालकांचे वेतन व भत्ते, विमा, इंधन तसेच विविध शासकीय नियम व तांत्रिक बाबींशी संबंधित खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरामध्ये प्रवासी वाहतूक सेवा देणे बसमालकांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक झाले असून, दरवाढ करणे आता अपरिहार्य झाल्याचे जुनवणे यांनी यावेळी सांगितले.
वाहतूक क्षेत्रालाही महागाईचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळेच पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनकडून दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीमध्ये प्रामुख्याने १३ सीटर ते ४९ सीटर बस, स्कूल बस, स्टाफ बस व टुरिस्ट बस याचा समावेश आहे.
ऑइलमध्ये ७० ते ८० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर एंड ब्ल्यूचा खर्च नव्याने वाढला आहे. चालकांचा पगार, भत्ता, आरटीओचे पासिंग व फिटनेस चार्जेस, विमा आणि शासकीय ई-चालनामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.