पुणे: खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दागिने चोरून नेल्याची घटना बंडगार्डन रस्ता तसेच कोंढवा भागात घडल्या. याप्रकरणी कोरेगाव पार्क आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले.
बंडगार्डन स्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आले. याबाबत सराफी पेढीतील रोखपालाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी बुरखा परिधान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर एका प्रसिद्ध सराफी पेढीत १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. महिलांनी सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतविले. दागिने खरेदीचा बहाणा करून महिलांनी चार लाख ७४ हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले.
कडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नुकतीच पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सराफी पेढीतील चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करीत आहेत.
कोंढवा भागातील एका सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द भागात विठ्ठल मंदिराजवळ सराफी पेढी आहे. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरल्या. महिलांनी सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. पसार झालेल्या महिलांंनी बुरखा परिधान केल्याचे सराफ व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.