Bribery pudhari
पुणे

Bribery: पुण्यात तलाठ्याचा रंगेहाथ लाच घेताना सापळा; २ लाखाची लाच पकडली

जमिनीच्या संगणकीय ७/१२ उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी तलाठ्याने मागितली लाच; ACB च्या पथकाने केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जमिनीच्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी चार लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्याला केडगाव चौफुला परिसरात रंगेहाथ पकडले.

दीपक नवनाथ आजबे (वय ३९, रा. आनंद हेरिटेज, केडगाव स्टेशन, मूळ रा. खापर पांघरी, जि. बीड) असे या तलाठ्याचे नाव आहे. तो दौंड तालुक्यातील देलवडी सजा येथील तलाठी आहे. याप्रकरणी, यवत पोलिस ठाण्यात आजबे याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शेतकरी यांनी २०१२ साली देलवडी येथे ०.०६ आर क्षेत्र खरेदी केले असून, तसा महसूल दफ्तरी ७/१२ वर नोंदी झालेल्या आहेत. जुलै २०२४ मध्ये तक्रारदार यांनी जमिनीचा संगणकीय ७/१२ उतारा काढला असता त्यावर तक्रारदार यांच्या नावे ०.०६ आर ऐवजी ०.०३ आर क्षेत्र नोंद दिसून आली. तक्रारदार यांनी संगणकीय ७/१२ वर दुरुस्ती होण्याकरीता ७ ऑगस्ट २०२४ रोजी तलाठी दीपक आजबे यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी तलाठी दीपक आजबे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी काम करून देण्याचे आश्वासन देत होते.

सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदार यांच्या संगणकीय ७/१२ उतार्‍यावर दुरुस्ती करण्याकरिता तलाठ्याने तक्रारदाराकडे हस्तलिखित ७/१२ उतार्‍याची प्रत मागविली. तेव्हा तक्रारदार यांनी हस्तलिखित प्रत तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तलाठी आजबे याला दिली. त्यावेळी ७/१२ वर दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यासाठी तलाठ्याने त्यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी ६ नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने ७ व १० नोव्हेबर रोजी पडताळणी केली.

तेव्हा ७ नोव्हेबर रोजीच्या पडताळणीमध्ये तलाठ्याने तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची मागणी करुन अडीच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. १० नोव्हेबर रोजीच्या पडताळणीत अडीच लाखांची मागणी करून तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा आयोजित केला. केडगाव चौफुला येथील साईराज कॅन्टीनमध्ये तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना १० नोव्हेबर रोजी सायंकाळी पावणे सहावाजता दीपक आजबे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे व अंमलदारांनी हा सापळा आयोजित केला होता. याबाबत पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT