पुणे: प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणातून प्रियकराने तरुणीसह तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला केला. तरुणी 45 टक्के भाजली असून, तिचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवर सध्या ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कर्नाटकातील हुबळीमधून आरोपी श्रीराम मधू सरुनवर (वय 20, रा. तोणवाला बैतुल, जि. अमला मध्य प्रदेश) याला अटक केली. याबाबत 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.20) रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रोड जनता महाविद्यालय शाळेजवळ घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी श्रीराम हे दोघे एकमेकांचे नातेवाईक असून, मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. 2025 मध्ये वाद झाल्याने तरुणीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तिने त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेशात एक गुन्हादेखील दाखल केला होता.
तेव्हापासून तो तिच्यावर चिडून होता. 2025 मध्ये भोपाळमध्ये एकत्र काम करीत असाताना आदर्श पांडेसोबत काम करत असताना दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी श्रीरामला दोघांमधील नात्याबाबत माहिती झाली होती. त्यामुळे तो त्यांना त्रास देत होता. 2026 मध्ये तरुणी आणि आदर्श हे दोघे पुण्यात आले. ताडीवाला रोड येथे लिव्हईनमध्ये राहून दोघे द मिलर रेस्टॉरंट बारमध्ये काम करीत होते. श्रीराम तरुणीला फोनवरून धमकी देत होता.
बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता रेस्टॉरंटमधील काम संपवून दोघे चालत घरी निघाले होते. श्रीरामने दोघांना जनता विद्यालय शाळेजवळ गाठले. त्याने तरुणीवर ॲसिड हल्ला केला. आदर्शच्या अंगावर देखील श्रीरामने ॲसिड फेकले. पाठीवर, हाताला, पायाला गंभीर इजा झाल्याने तरुणी कोसळली. श्रीरामने तेथून पळ काढला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तरुणी आणि तिच्या मित्राला ससूनला दाखल केले.
गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस हे आरोपी श्रीरामचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तेव्हा तो रेल्वे स्टेशनवरून चालुक्य एक्सप्रेसमध्ये बसून गेल्याचे निदर्शनास आले. त्याने तीन वेळा वेश बदलला. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, तानाजी देशमुख यांच्या पथकाने श्रीराम याला हुबळी कर्नाटक येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक राम राजमाने, सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.