Borewell Pudhari
पुणे

Pune Borewell Water Crisis: पुण्यात बोअरवेल पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये; पाणीकपातीमुळे सोसायट्यांचा पर्याय सक्रिय

दिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर टँकरच्या दरवाढीचा फटका; कोथरूड, औंधसह अनेक भागांत जुन्या बोअरवेल्सची दुरुस्ती सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. टँकरचे वाढते दर, मर्यादित पाणीपुरवठा आणि भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांनी पर्यायी जलस्रोतांचा शोध सुरू केला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या बोअरवेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

कोथरूड, औंध, सिंहगड रस्ता, कात्रज, शिवाजीनगर, पाषाण, धनकवडी आणि नगर रस्ता परिसरातील अनेक सोसायट्यांनी बंद पडलेल्या बोअरवेल्सची दुरुस्ती सुरू केली आहे. या बोअरवेल्स बहुतांश निवासी प्रकल्प उभारणीच्या काळात खोदण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर त्यांचा वापर बंद झाला होता. आता पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर त्याच बोअरवेल्स पुन्हा उपयोगात आणल्या जात आहेत.

सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मते, बोअरवेलमधील पाणी बागकाम, परिसर स्वच्छता आणि शौचालयातील फ्लशिंगसाठी वापरल्यास महापालिकेकडून मिळणारे पाणी हे पिणे व स्वयंपाक यांसारख्या आवश्यक गरजांसाठी राखून ठेवता येईल. त्यामुळे पाण्याचा अधिक परिणामकारक वापर होण्यास मदत होईल. मात्र, जुन्या बोअरवेल्स पुन्हा सुरू करणे सोपे नाही. अनेक ठिकाणी पंप दुरुस्ती, पाइपलाइन स्वच्छ करणे, विद्युत यंत्रणा कार्यान्वित करणे आणि विहिरीची तपासणी यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. कुशल तंत्रज्ञांची कमतरता असल्याने अनेक सोसायट्यांना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तज्ज्ञांना बोलवावे लागत आहे.

एका बोअरवेलवर साधारण १० ते १५ हजार रुपये खर्च होत असून, काही ठिकाणी हा खर्च अधिकही आहे. याशिवाय, अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडे महापालिकेचे आणि बोअरवेलचे पाणी स्वतंत्र साठवण्यासाठी वेगवेगळ्या टाक्यांची सुविधा नाही. त्यामुळे अतिरिक्त टाक्या उभारणे आणि प्लंबिंगमध्ये बदल करणे याचाही विचार सुरू आहे. टँकरचे वाढते दर आणि मर्यादित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या बोअरवेल्स अनेक सोसायट्यांसाठी सध्या मोठा आधार ठरत आहेत.

कोणत्या भागांत वाढली बोअरवेल दुरुस्ती?

  • कोथरूड, औंध, पाषाण, धनकवडी, सिंहगड रस्ता, कात्रज, शिवाजीनगर, नगर रस्ता परिसर.

  • बोअरवेल पुन्हा सुरू करण्यासाठी काय?

  • पंपाची दुरुस्ती, पाइपलाइन स्वच्छ करणे, विद्युत जोडणी पूर्ववत करणे, मोटार व नियंत्रण यंत्रणा तपासणी, जलउपसा चाचणी

किती येतो खर्च?

  • बोअरवेलदुरुस्ती १० ते १५ हजार रुपये

  • काही ठिकाणी खर्च १५ हजारांपेक्षा अधिक

  • अतिरिक्त पाण्याची टाकी व प्लंबिंग बदलासाठी स्वतंत्र खर्च

बोअरवेलचे पाणी कुठे वापरता येते?

  • बागांना पाणी देण्यासाठी

  • सोसायटी परिसर स्वच्छतेसाठी

  • शौचालयातील फ्लशिंगसाठी

  • वाहन धुणे व इतर दुय्यम वापरासाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT