Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Shortage: बिबवेवाडी पाणीटंचाई तीव्र; टँकर मागणी 500 वर, खासगी टँकरचे दर वाढले

पुण्यात पाणीपुरवठा अपुरा; सोसायट्यांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून खर्चात मोठी वाढ झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

बिबवेवाडी: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तळाला गेल्याने शहरासह उपनगरांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याने बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि गंगाधाम परिसरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या, तसेच नव्याने विकसित होत असलेल्या भागांमध्ये पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे.

पद्मावती येथील टँकर भरणा केंद्रातून (पंपिंग स्टेशन) दररोज भरून जाणाऱ्या टँकरची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. परिसरात महापालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे अनेक सोसायट्यांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसावर अवलंबून न राहता पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न सोसायट्यांकडून सुरू आहे. पाणीकपात सुरू होण्यापूर्वी पद्मावती येथील टँकर भरणा केंद्रातून दररोज सरासरी २६० ते २७९ टँकर भरून जात होते. मात्र, पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी वाढली आहे. सध्या या केंद्रात दररोज ५०० हून अधिक टँकर भरले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीटंचाईचा फायदा घेत खासगी टँकरचालकांनी टँकरचे दर ७०० रुपयांवरून १,२०० ते १,५०० रुपयांपर्यंत वाढविल्याने सोसायट्यांवर आर्थिक ताण येत आहे. काही सोसायट्यांचे टँकरसाठी महिन्याला लाखो रुपये खर्च होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेकडून मोफत टँकर सुविधा

महापालिकेच्या वतीने पद्मावती येथील टँकर भरणा केंद्रातून दोन ठेकेदारांमार्फत नागरिकांच्या मागणीनुसार मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित कनिष्ठ अभियंता किंवा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून नागरिकांना टँकरची मागणी करता येते. या सेवेसाठी महापालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. टँकर उपलब्ध करून देण्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असल्यास तत्काळ पाणीपुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT