Land Pudhari
पुणे

Pune BDP Land Acquisition: पुण्यातील बीडीपी जमीनमालकांना १०० टक्के मोबदल्याची शिफारस; भूसंपादनाचा ९० टक्के भार राज्य सरकार उचलणार?

उच्चस्तरीय समितीचा राज्य शासनाला प्रस्ताव; पुणे महापालिकेचा १० टक्के हिस्सा, सरकारी मालकीची १२५.४५ हेक्टर जमीन विकसित करण्याचीही सूचना

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

पुणे: शहरातील डोंगरमाथा-डोंगरउतारावरील जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणातील जमीनमालकांना सध्याच्या आठ टक्के हस्तांतरणीय विकास हक्कांऐवजी (टीडीआर) भूसंपादन कायद्यानुसार १०० टक्के मोबदला द्यावा, त्यामधील खर्चाचा भार राज्य सरकारने ९० टक्के, तर पुणे महापालिकेने १० टक्के इतका उचलावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाला केली आहे.

पुणे महापालिका हद्दीतील बीडीपी आरक्षणाबरोबरच आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या हद्दीतील डोंगरमाथा-डोंगरउतारावरील क्षेत्राबाबत सर्वसमावेश विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी माजी आयएस अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला यासंबंधीच्या शिफारशी सुचविल्या आहेत. समाविष्ट २३ गावांमधील टेकड्यांवरील बीडीपी आरक्षणाला शासनाने ५ ऑगस्ट २०१५ रोजी मंजुरी दिली आहे.

त्यानंतर १८ ऑगस्ट २०१८ रोजी जमीनमालकांना आठ (०.०८) टक्के टीडीआर देण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, हा मोबदला अपुरा असल्याची भावना जमीनमालकांमध्ये असल्याने बहुतांश मालकांनी जमिनी महापालिकेच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. परिणामी, आजपर्यंत बीडीपी आरक्षणातील एक चौरस फूट जमीनही नियोजन प्राधिकरणाच्या ताब्यात आलेली नाही. उच्चस्तरीय समितीच्या मते, भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना योग्य मोबदला व पारदर्शकतेचा अधिकार अधिनियम २०१३ किंवा तत्सम आरक्षणांसाठी लागू असलेल्या प्रचलित धोरणानुसार जमीनमालकांना योग्य मोबदला मिळायला हवा. त्यानुसार जमिनीच्या १०० टक्के इतका मोबदला देण्याचे समितीने सुचविले आहे.

तसेच, बीडीपी आरक्षणातील विकास आराखड्यातील रस्त्यांच्या संपादनासाठीही शहरातील अन्य अविकसित क्षेत्रांतील रस्त्यांप्रमाणे टीडीआर धोरण लागू करावे, असे स्पष्ट केले. भूसंपादनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने महापालिकेच्या आर्थिक क्षमतेवर संपूर्ण भार टाकणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारचा सक्रिय आर्थिक सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत भूसंपादनाच्या ९० टक्के खर्च राज्य शासनाने, तर उर्वरित १० टक्के महापालिकेने उचलावा, असेही समितीने नमूद केले आहे.

सरकारी जमिनींबाबत स्वतंत्र तरतूद

बीडीपी आरक्षणातील शासनाच्या मालकीची सुमारे १२५.४५ हेक्टर जमीन तातडीने विकसित करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, सीएसआर आणि शैक्षणिक संस्थांची मदत घ्यावी. पाच वर्षांचा विकास आराखडा आणि त्यासाठी लागणारा खर्च महापालिकेने तयार करून शासनाला सादर करावा, असे समितीने सुचविले आहे. क्रमशः

उच्चस्तरीय समितीने केलेल्या महत्त्वाच्या शिफारशी

  • राज्य सरकारचा भूसंपादन खर्चातील हिस्सा : ९० टक्के

  • पुणे महापालिकेचा हिस्सा : १० टक्के

  • जमीनमालकांना १०० टक्के मोबदला

  • भूसंपादनासाठी विशेष कृती दलाची स्थापना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT