पुणे: मुंढवा परिसरातील ‘बॅस्टियन’ क्लबमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही तरुण-तरुणी सार्वज निक ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे पुण्यातील नाइट लाइफ, पबसंस्कृती आणि त्यावरच्या नियंत्रणा बाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री या क्लबची सहमालकीण असल्याचे समजते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या आवाजातील संगीत, मद्यधुंद वातावरण आणि बेशिस्त वर्तन स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, क्लबमध्ये उपस्थित असलेल्या इतरांकडूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत असल्याने समाज माध्यमांवर तीव प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘पुणे नेमके कुठे चालले आहे?’ असा सवाल उपस्थित करीत अनेकांनी पोलिस आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, बाणेर, बालेवाडी आणि विमाननगर परिसरात गेल्या काही वर्षांत पब, बार, लाउंज आणि हुक्का पार्लरचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या ठिकाणांमुळे वाहतूक, ध्वनिप्रदूषण, मद्यधुंद तरुणांचा त्रास आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न वारंवार समोर येत आहेत.
दरम्यान, ‘बॅस्टियन’ क्लबमधील व्हायरल व्हिडीओनंतर पालक वर्गातूनही चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांवर या वाढत्या पबसंस्कृतीचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित तपासणी मोहीम राबवावी तसेच नियमभंग करणाऱ्या पबवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
संबंधित घटनेप्रकरणात चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.स्मिता वासनीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे