पुणे : शहरात बेकायदा वास्तव्य करून देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना न्यायालयाने दोन वर्षे दोन महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत दोषी ठरवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. तसेच सरकारने त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी असेही निकालात नमूद केले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने 9 ऑक्टोबर 2023 रोजी बुधवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली होती. आरोपी महिलांनी बांगलादेशी असल्याचे सांगून पारपत्र किंवा वैध कागदपत्रे नसताना सीमारेषेवरून चोरट्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. या आरोपी महिला चार वर्षांपासून पुण्यात देहविक्रीचा व्यवसाय करत होत्या.
या सातही महिलांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर करण्यात आले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी बाजू मांडली. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 106 नुसार, आरोपींनी आपण भारतीय आहोत हे सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, ते सिद्ध करण्यात अपयश आले. देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या आरोपी महिलांना कठोर शिक्षा ठोठावून त्यांची बांगलादेशात रवानगी करावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी केला.
अधिकृत कागदपत्रांविना देशात प्रवेश करून वास्तव्य करणे गंभीर गुन्हा आहे. आरोपींनी गंभीर गुन्हा केला असून, त्यांना दयामाया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. आरोपी महिला गरिबीमुळे भारतात आल्या असून, त्या बांगलादेशच्या असल्याचे सिद्ध झाल्याने राज्याने त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे. अटक झाल्यापासून आरोपी महिला कोठडीत असल्याने हा कालावधी शिक्षेचा काळ धरून त्यांना बांगलादेशात पाठवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.