Pune Illegal Bangladeshi Pudhari
पुणे

Pune Illegal Bangladeshi Case: बेकायदा बांगलादेशी तरुणीला अभय; फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला हवालदार निलंबित

माहिती वरिष्ठांना न देता तरुणीला सोडल्याचा व पैसे घेतल्याचा आरोप; पुण्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीचे प्रकरण फरासखाना पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस हवालदाराला चांगलेच भोवले आहे. तरुणीबाबत माहिती मिळाल्यानंतर ती वरिष्ठांना न देता तिला सोडून दिल्याचा, तसेच तिच्याकडून काही पैसे घेतल्याचा देखील आरोप या महिला पोलिस हवालदारावर आहे.

दरम्यान, फरासखाना पोलिसच बांगलादेशींना अभय देत असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनीषा पुकाळे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. याबाबतचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी शुक्रवारी (दि.6) रात्री दिले. पुकाळे या फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होत्या.

शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या विरुद्ध पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बांगलादेशींवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. असे असताना देखील फरासखाना पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांकडून बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना अभय दिल्याचे दिसून येत आहे.

अल्पवयीन असताना ही बांगलादेशी तरुणी 2023 मध्ये पुण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षे ती बुधवार पेठेत वास्तव्य करत असतानासुद्धा पोलिसांच्या नजरेस कशी पडली नाही, त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याच तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फरासखाना पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, गुन्हा दाखल करण्यापूर्वी ही तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. ती पोलिस हवालदार पुकाळे यांना भेटली. त्यानंतर ती पोलिस ठाण्यातून निघून गेली. जर बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आली, तर नियमानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, असे असताना देखील पुकाळे यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत अनभिज्ञ ठेवले. तसेच तिच्याकडून काही पैसे देखील घेतले.

काही सामाजिक कायकर्त्यांनी विषय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पीडीत तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिच्याकडील चौकशीत पुकाळे यांचा प्रकार समोर आला. बुधवार पेठेतील त्या वस्तीतील अर्थकारण मोठे आहे. त्यामुळे काही पोलिसांकडून आपसूकच तेथे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यापूर्वी देखील बुधवार पेठेत एका पोलिसाचा खून झाला होता. मारामारी, खुनी हल्ले येथील नित्याच्याच गोष्टी आहेत, तर अमलीपदार्थांच्या एका कारवाईत देखील फरासखाना पोलिस ठाण्यातील काही पोलिसांची नावे चर्चेत आली होती. त्यानंतर आता बांगलादेशींना अभय देण्याचा हा प्रकार समोर आला आहे.

पाहा नेमका काय आहे प्रकार !

तरुणी मूळची बांगलादेशातील रहिवासी असून, सन 2023 मध्ये 15 वर्षांची असताना तिला देशात आणण्यात आले. कोलकात्यात काही दिवस ठेवल्यानंतर तिला थेट बुधवार पेठेतील एका इमारतीत सोपवण्यात आले. तेथे दलाल महिलेने ‌‘पाच लाख रुपयांना विकत घेतले आहे, दहा लाख रुपये दिल्याशिवाय येथून सोडणार नाही,‌’ अशी धमकी देत तिला जबरदस्तीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. अल्पवयीन असल्याचे स्पष्ट सांगूनही तिची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तेथून सुटका मिळाल्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. बुधवार पेठेतीलच इतर ठिकाणी आश्रय घेऊन पुन्हा वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडित तरुणीने मदतीसाठी मित्राशी संपर्क साधून सुटका केली. त्यानंतर ती महिला पोलिस हवालदार पुकाळे यांच्या संपर्कात आली होती.

...तीन वर्षे तरुणी सापडली नाही?

गेल्या काही महिन्यांपासून बुधवार पेठ परिसरात बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात तब्बल तीन वर्षे बुधवार पेठेत वावरत असलेली संबंधित तरुणी कोणत्याही मोहिमेत पोलिसांच्या हाती लागली नाही, हा खरा सवाल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT