बाणेर: बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने बुधवारी (दि. 8) औंध क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन पोटे, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, भक्ती गायकवाड, राहुल कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद डोंगरे, बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिक तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आदी मुद्द्यांवर सर्वंकष आढावा घेण्यात आला. पासपोर्ट कार्यालय व या ठिकाणी झालेल्या बँकेची सर्व वाहने नवीन होत असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोडवर सध्या पार्क केली जात आहे. त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी वाहतूक कोंडीवर होणार असल्याचे लक्षात येत आहे. तसेच, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यावसायिक इमारतींना पार्किंग व्यवस्था कशी आहे, याची तपासणी करण्यात यावी. व्यावसायिक इमारतीने व्यवस्थित पार्किंग सोडलेले नसतील तर येथील आमच्या हक्काच्या आरक्षित जागा त्यासाठी वापरण्यात येऊ नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली.
पाहणी करून करणार मास्टर प्लॅन
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील व्यावसायिक इमारतीची पार्किंग व्यवस्था तपासणे गरजेचे आहे. मोठमोठ्या व्यावसायिक इमारती उभारल्या असून, पार्किंग व्यवस्था मात्र अपुरी असल्याचे या ठिकाणी लक्षात येत आहे. आठवड्यात महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग आणि पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला जाईल. पाहणी अहवालाच्या आधारे सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल.
समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा आधीच नियोजन करून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजित पावले उचलली पाहिजेत. पासपोर्ट सेवा केंद्र ही नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा आहे. मात्र, त्याचा परिसरातील वाहतूक व नागरी व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.सनी निम्हण, नगरसेवक, मनपा पुणे
दररोज या ठिकाणी जवळपास पंधराशे ते सोळाशे नागरिकांना अपॉइंटमेंट दिली जाणार असून, पासपोर्ट कार्यालयात येणार आहेत. पार्किंगबाबत शेजारील असलेल्या आरक्षित जागेसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. पण, त्यावर अद्याप काहीच उत्तर आले नसल्याने सध्या वाहनचालक रस्त्यावर व इतरत्र वाहन पार्क करीत आहेत. पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे.जतिन पोटे, प्रतिनिधी, पासपोर्ट कार्यालय, बाणेर-पाषाण रोड