पुणे : प्रेमसंबंध तोडून टाकल्याच्या कारणातून तरुणाने प्रेयसीवर पिस्तुलातून तीनवेळा गोळीबाराचा प्रयत्न केला. गोळी फायर न झाल्यामुळे सुदैवाने तरुणी थोडक्यात बचावली. ही घटना बाणेर येथील विरभद्रनगर येथील एका खासगी संस्थेच्या आवारात शुक्रवारी (दि. 29) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास घडल्यानंतर गोळीबार करणार्या प्रियकराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने बेड्या ठोकल्या. तो खडकी बाजारकडे जाणार्या रस्त्यावर गाडी लपवून ठेवण्यासाठी जात असतानाच गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Latest News)
पिस्तूल, तीन काडतुसे, दुचाकी असा 1 लाख 33 हजारांचा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. गौरव महेश नायडू (वय 25, रा. श्रीरंग रेसिडेन्सी, गायकवाडनगर, पुनावळे, पुणे) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
तक्रारदार तरुणी बाणेर भागातील खासगी कंपनीत प्रशिक्षण घेत असून, शुक्रवारी (दि. 29) सकाळी दहाच्या सुमारास ती कंपनीत निघाली होती. त्यावेळी आरोपी गौरवने तिला इमारतीच्या आवारात अडविले. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियकर हल्ला करण्याच्या तयारीत असताना तरुणी घाबरली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. मुलीवर गोळीबार करणारा आरोपी खडकी बाजार रस्ता परिसरात जाणार असल्याची माहिती युनिट चारला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गौरव नायडू याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम, सुभाष आव्हाड, जहाँगीर पठाण, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम यांच्या पथकाने केली.