Manjusha Nagpure Pudhari
पुणे

Pune Band MPSC Protest: पुणे बंद करून दाखवाच! रोहित पवारांना महापौर मंजूषा नागपुरेंचे थेट आव्हान

एमपीएससी आंदोलनाला राजकीय रंग; ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांआडून पुणेकरांना वेठीस धरू नका’, नागपुरे-बीडकरांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता पुणे बंदच्या इशाऱ्यामुळे राजकीय रंग चढला आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारने अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास पुणे बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिले.

पुणे शहर बंद करून दाखवाच, असे आव्हान देत, विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे; मात्र, त्यांच्या प्रश्नांच्या आडून पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा नागपुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिला. स्पर्धा परीक्षेतील अनियमितता यावरून आमदार रोहित पवार यांनी पुण्यात एस.एम. जोशी पुलावर आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी मागण्या मान्य न झाल्‍यास पुणे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर महापौर मंजूषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषद घेत वरील इशारा दिला.

महापौर नागपुरे म्हणाल्या, पुणेकरांचा बाणा वेगळा आहे. पुणेकर काय आहेत, हे बंदचे आवाहन करणाऱ्यांना कळेल. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण केले जात आहे. पुणे हे देशभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून शहराचे जनजीवन ठप्प करण्याचा प्रयत्न केला, तर पुणेकर तो सहन करणार नाहीत, असे नागपुरे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाचा अधिकार; पण पुणेकर वेठीस नको

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत करून किंवा शहर बंद पाडून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. कोणत्याही राजकीय आंदोलनामुळे पुणे बंद पडू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना अडीच ते तीन तास वेळ देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली असून, काही मागण्यांवर निर्णयही घेतले आहेत. त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्यामागे नेमका हेतू काय, असा सवाल नागपुरे यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावे

राजकीय आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले. पालक मोठ्या अपेक्षेने मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे शैक्षणिक नुकसान करून घेऊ नये. राजकीय भूमिकांसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे त्या म्हणाल्या. राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आडून आंदोलन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बिडकरांचाही पवारांना इशारा

गणेश बिडकर यांनीही पुणे बंदच्या भूमिकेवरून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणेकरांपेक्षा कोणी मोठे नाही. पुणे बंद करण्याची धमकी देऊ नये. पुणेकरांचा संयम तोडू नये, असे ते म्हणाले. आंदोलनाच्या अधिकाराला विरोध नाही; मात्र, त्या माध्यमातून पुणेकरांना वेठीस धरले जात असेल, तर त्याला विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT