Pune Balnatya Pudhari
पुणे

Pune Balnatya: पुण्यात बालनाट्य हंगामाला फटका; उन्हाळी सुट्यांतील उशीरामुळे प्रयोगांची संख्या घटली

शाळांच्या सुट्या उशिरा, नाट्यगृहांच्या तारखा व वाढता खर्च यामुळे बालरंगभूमीला आर्थिक नुकसान; पुढील वर्षावरही परिणामाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: उन्हाळी सुट्ट्या म्हणजे बालनाटकांचा हंगाम आणि बालरंगभूमीचा उत्सव. मात्र, यंदाचा उन्हाळा पुण्यातील बालनाट्य संस्थांसाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचा ठरला आहे. शाळांना उशिरा लागलेल्या सुट्या, त्यामुळे झालेला बालनाटकांच्या प्रयोगांच्या नियोजनावर झालेला परिणाम, नाट्यगृहांच्या तारखा मिळविण्यासाठी निर्मात्यांना करावी लागलेली कसरत, वाढलेला निर्मिती खर्च आणि उन्हाच्या वाढलेल्या तडाख्यामुळे बालनाटकांच्या प्रयोगांवर मोठा परिणाम झाला. प्रयोगांची संख्या घटली, तिकीट विक्रीही कमी झाली आणि त्यामुळे अनेक संस्थांचे आर्थिक नुकसान झाले. यंदाचा उन्हाळी हंगाम अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत व्यक्त करत या आर्थिक तोट्याचा परिणाम पुढील वर्षीच्या नाट्यनिर्मितीवर होणार असल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे.

दरवर्षी एप्रिल ते जून या उन्हाळी सुट्यांमध्ये बालनाटकांचे विशेष प्रयोग आयोजित केले जातात. याच कालावधीत संस्थांना वर्षभराच्या उपक्रमांसाठी आर्थिक बळ मिळते. मात्र, यंदा शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक उशिरा निश्चित झाल्याने अनेक संस्थांचे नियोजन कोलमडले. आधीच मर्यादित उपलब्ध असलेल्या नाट्यगृहांच्या तारखा मिळविताना निर्मात्यांची दमछाक झाली. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पालकांनी मुलांना घराबाहेरील उपक्रमांपासून दूर ठेवण्यास प्राधान्य दिले.

परिणामी अनेक प्रयोगांना अपेक्षित प्रेक्षकसंख्या मिळाली नाही. तिकीट विक्री घटल्याने उत्पन्न कमी झाले, तर सभागृह भाडे, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, वेशभूषा आणि वाहतूक खर्च वाढल्याने खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण झाले. अनेक संस्थांनी नियोजित प्रयोगांची संख्या कमी केली, तर काहींना प्रयोग रद्द करण्याची वेळ आली. याचा परिणाम केवळ आर्थिक पातळीवरच नव्हे, तर बालकलाकारांच्या रंगमंचीय अनुभवावरही झाला. दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये रंगमंचावर झळकणाऱ्या अनेक नवोदित बालकलाकारांना यंदा अपेक्षित संधी मिळू शकली नाही.

याबाबत बालनाट्य दिग्दर्शक संतोष माकुडे म्हणाले, शाळांना उशिरा सुटी लागल्याने संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले. नाट्यगृहांच्या तारखा मिळण्यात अडचणी आल्या. त्यातच सभागृह आणि साहित्याचे वाढलेले भाडे परवडणारे नव्हते. त्यामुळे यंदा आम्हाला केवळ तीनच प्रयोग करता आले. बालकलाकारांनाही रंगमंचावरील सादरीकरणाच्या संधी कमी मिळाल्या.

प्रयोग कमी, उत्पन्नात घट

ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक देवदत्त पाठक म्हणाले, 'बालरंगभूमी ही मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची शाळा आहे. मात्र, यंदा अनेक अडचणी एकाच वेळी आल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. शाळांना उशिरा सुट्या लागल्याने प्रयोगांच्या नियोजनावर झालेला परिणाम, उन्हाचा वाढता तडाखा आणि नियोजनातील अडथळे यामुळे प्रयोगांची संख्या घटली. त्याचा थेट परिणाम संस्थांच्या उत्पन्नावर झाला आहे.'

नाट्यगृहांच्या तारखांचा पेच कायम

बालनाटकांचे निर्माते सुनील महाजन म्हणाले, महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये वीकेंडच्या तारखा मिळणे कठीण झाले आहे, तर खासगी नाट्यगृहांचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक संस्थांचे नियोजन बिघडले. याचा परिणाम पुढील वर्षीच्या बालनाट्य निर्मितीवर होण्याची शक्यता आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT