पुणे: महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात प्रभाग ८ आणि प्रभाग ९ ची मतमोजणी पार पडली. निवडणुकीचे कल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्रात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका प्रभागाच्या मंतमोजणीला तब्बल ८ तास लागले. प्रभाग ८ चा निकाल ४ वाजता जाहीर करण्यात आला. प्रभाग ८ आणि ९ ची मतमोजणी ही बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पार पडली. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी मतमोजणीसाठी आपले अधिकृत कार्यकर्ते केंद्रांवर पाठवले होते. तब्बल २० टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले होते. हातात कागद आणि पेन घेऊन निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सूचना सर्वपक्षीय कार्यकर्ते ऐकून घेत होते.
१० वाजता मतमोजणी सुरू झाल्यावर कार्यकर्ते मतांचे आकडे नोंदवून घेत होते. पहिल्या फेरीत काही ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. एकूण सहा फेऱ्या पार पडल्या. हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट झाले. भाजप उमेदवारांनी आघाडी घेतल्यावर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते जल्लोष सुरू केला. सायंकाळी ४ वाजता संपूर्ण निकाल लावल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी विजयी झाल्या उमेदवारांना निवडणूक प्रमाणपत्र घेण्यास बोलावले. परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड आणि सनी निम्हण यांनी त्यांच्या हस्ते प्रमानपत्र स्वीकारले.
भाजपची विजयी मिरवणूक
भाजपचे चारही उमेदवार निवडून आल्यावर प्रभाग ८ च्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीचे आयोजन केले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला, तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. केंद्राबाहेर फटाके वाजवून प्रभागापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
निकाल स्पष्ट होताच पराभूत उमेदवार पडले केंद्राबाहेर
मतमोजणीचे चित्र १२ नंतर स्पष्ट होऊ लागले. आपला पराभव स्पष्ट असल्याचे जाणवल्यावर परभूत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी अर्धवट सोडून केंद्राबाहेर पडले. अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे हे नाराज होऊन बाहेर पडले. त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते.
ढिसाळ नियोजनामुळे प्रभाग ९ ची मतमोजणी ५ वाजता सुरू
एका प्रभागाची मतमोजणी आधी असे नियोजन असल्याने प्रभाग ८ ची मतमोजणी आधी पूर्ण करण्यात आली. मात्र, ही मतमोजणी अतिशय संथ गतीने सुरू होती. फेरी पूर्ण होऊनही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. ४ फेऱ्या पूर्ण झाल्यावर काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली. यानंतर काही वेळात पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली. यामुळे प्रभाग ८ च्या निकाल यायला ८ तास लागले. त्यामुळे प्रभाग ९ ची मतमोजणी ही ५ वाजता सुरू करण्यात आली.