पुणे : बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात तिघांनी भरदिवसा एका सतरावर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते अल्पवयीन असल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवस्तीत ऐन रहदारीच्या रस्त्यावर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.(Latest Pune News)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडल-1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावलेे तसेच खडक, विश्रामबाग व फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी वेगाने तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले. मयंक सोमदत्त खरारे (वय 17, रा. साने गुरुजीनगर, पीसीएमसी कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी मयंकच्या मानेवर, डोक्यात आणि तोंडावर वार केले होते. हल्ला एवढा भयानक होता, की रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडाला. हल्ल्यात मयंकचा मित्र देखील जखमी झाला आहे.
ऐन वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या खुनानंतर मध्यवस्तीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी सव्वातीनच्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ दखनी मिसळसमोर घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक दुपारी सव्वातीनच्या सुमारास बाजीराव रस्त्याने एका मित्रासोबत दुचाकीवरून निघाला होता. येथील महाराणाप्रताप उद्यानासमोर तो आला असता, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन आरोपींनी त्याला गाठले. त्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावले होते. आरोपींनी वेगाने पुढे जाऊन मयंकच्या दुचाकीला त्यांची दुचाकी धडकवली. त्यामुळे मयंक व त्याचा मित्र खाली पडले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने मयंकवर वार केले. डोक्यात, मानेवर आणि तोंडावर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वार वर्मी लागल्याने मयंकचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी शस्त्र टाकून आरोपी दुचाकीवरून फरार झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक खडक पोलिस ठाण्याचेही पथक तेथे दाखल झाले. मयंकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तो जागीच मरण पावल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. घटनास्थळी रक्ताचा पडलेला सडा पाहून रस्त्याने चाललेल्या नागरिकांचा थरकाप उडाला. या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या पडताळणीनंतर तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले. तिघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
तिघांनी युवकावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडक पोलिस ठाणे