Water Tank Collapse Pudhari
पुणे

Pune Water Tank Collapse: पुण्यात ५० फूट उंच पाण्याची टाकी अचानक कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला जीवदान

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील दुर्घटना; अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नांनंतर केली सुटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह परिसरातील अत्यंत धोकादायक आणि जुनी सुमारे ५० फूट उंच पाण्याची टाकी मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात येत असताना अचानक कोसळली. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. मात्र, पुणे महानगर पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे व धाडसामुळे या कामगाराला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे ही धोकादायक टाकी पाडण्याचे काम सुरू होते. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हे काम सुरू असताना अचानक टाकी कोसळली आणि एक कामगार ढिगाऱ्याखाली दाबला गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कौशल्याने आणि वेळेचे भान राखत जखमी कामगाराशी संवाद साधला.

जवानांचे सर्वत्र कौतुक - अग्निशमन अधिकारी नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी बोल्ड कटर, स्प्रेडर, टिकाव, फावडे आणि दोरखंडाचा वापर करीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी ढिगारा बाजूला सारत जखमी कामगाराला सुखरूप बाहेर काढले आणि उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत जवानांच्या तत्परतेमुळे एका कामगाराचे प्राण वाचू शकल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी नीलेश महाजन यांच्यासह राजू ओव्हाळ, अमित कसबे, भाऊसाहेब चोरमले, विजय पिंजण, जयेश गाताडे, अल्पेश कोंडे, नवनाथ जेडगे, मारुती देवकुळे, विशाल गायकवाड, आतीश ओव्हाळ, प्रताप सांगळे, सुरेश पवार, प्रतीक कुंभार, विजू वाघमारे, मयूर चव्हाण आणि दत्ता खांडरे या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT