Millisecond Pulsar Discovery Pudhari
पुणे

Millisecond Pulsar Discovery: आपल्या आकाशगंगेत सापडले पाच नवीन न्यूट्रॉन तारे; 'एनसीईआरए'च्या शास्त्रज्ञांचे संशोधन

काय आहे नेमके संशोधन?

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपल्या अलकनंदा या आकाशगंगेपासून हजारो प्रकाशवर्षे दूर अंतरावर पाच तारकासमूहांचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीईआरए) च्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे.

अणुऊर्जा विभागाची अनुदानित संस्था असलेल्या एनसीईआरएच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथील पीएचडी विद्यार्थी ज्योतिर्मय दास यांच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने, मेसियर ६९ आणि मेसियर ७० या दोन प्राचीन गोलाकार तारकासमूहात मिलिसेकंद पल्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच नवीन वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यांचा शोध लावण्यात मोठे यश मिळवले आहे.

भारताच्या अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यू-जीएमआरटीए ) चा वापर करून केलेल्या शोधांमुळे या तारकागुच्छांमध्ये पल्सरचा शोध लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्यामुळे आपल्या आकाशगंगेतील काही सर्वात जुन्या आणि सर्वाधिक दाट तारकासमूहात डोकावण्यासाठी एक शक्तिशाली नवीन दालन उघडले आहे. 'द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल'मध्ये नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यात भारत, जर्मनी, अमेरिका आणि यूके येथील संशोधकांचा समावेश आहे.

काय आहे नेमके संशोधन?

या अभ्यासात पाच वेगाने फिरणाऱ्या पल्सरचा शोध लावला, त्यापैकी एम ६९ आणि एम ७० हे तारे प्रत्येक सेकंदाला शेकडो वेळा फिरत आहेत. एम ६९ हा एक लक्षवेधी पल्सर असून, तो एका साथीदार ताऱ्यासोबत नृत्यात गुंतलेला आहे आणि ते दर काही दिवसांनी एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालत आहेत.

न्यूट्रॉन तारे म्हणजे काय?

मिलिसेकंद पल्सर हे प्रचंड वस्तुमानाचे ताऱ्यांचे अवशेष आहेत, जे महाकाय तारे सुपरनोव्हा म्हणून स्फोट झाल्यावर तयार होतात आणि मागे न्यूट्रॉन तारे सोडतात. कालांतराने हे मृत तारे पुन्हा जिवंत होतात, ज्यामुळे ते वैश्विक भोवरे बनतात आणि प्रत्येक सेकंदाला शेकडो वेळा फिरतात.

फिरत असताना ते दीपगृहाच्या किरणांप्रमाणे अवकाशात रेडिओ लहरींचे झोत पसरवतात. नैसर्गिक वैश्विक घड्याळांप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षणाची चाचणी, ताऱ्यांची उत्क्रांती याचा मागोवा घेण्यास मदत होते.

या शोधामुळे ग्लोब्युलर क्लस्टर्समधील ज्ञात पल्सर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आकाशगंगेतील ताऱ्यांची अत्यंत दाटीवाटीने वसलेली क्षेत्रे तपासण्याची विलक्षण क्षमता दिसून आली आहे. जीसी-जीपीएस सर्वेक्षणाने पहिल्यांदाच अशा तारकासमूहामंध्ये पल्सर्स शोधून काढले आहेत. आकाशगंगेत अजूनही अनेक पल्सर्स लपलेले आहेत जे शोधले जाऊ शकतात.
- जयंता रॉय, संशोधक एनसीईआरए, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT