पुणे: कांदा, बटाटा आणि लसणाच्या उत्पादनात वाढ होऊन झालेल्या दर घसरणीचा परिणाम पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर झाला आहे. मागील वर्षी कांदा, बटाटा आणि लसणाचे दर कमी राहिल्याने बाजार समितीच्या उलाढालीत तब्बल 550 कोटींची घट झाली. गूळ-भुसार आणि फळविभाग वगळता बहुतांश विभागात समाधानकारक कामगिरी न झाल्याचा परिणामही यंदा दिसून आला. परिणामी, 2025-2026 या आर्थिक वर्षात बाजार समितीच्या एकूण उत्पन्नात 5 कोटी 44 लाख 28 हजार 197 रुपयांची घट झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मागील वर्षीच्या तुलनेत गूळ-भुसार आणि फळविभाग वगळता कांदा, बटाटा आणि तरकारी विभागात यंदा उत्पन्नात घट झाली आहे. याखेरीज, बाजार शुल्क, स्थावर उत्पन्न, खडकी बाजार, मांजरी बाजार इतर उत्पन्नातही काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्वांचा परिणाम एकूण उत्पन्नावर झाला आहे.
कांदा, बटाटा विभागात सर्वाधिक 6 कोटी 24 लाख 29 हजारांची घट आहे. बाजार शुल्कात 4 कोटी 22 लाख 12 हजार 189 रुपये, स्थावर उत्पन्नात 9 लाख 70 हजार रुपये, गुंतवणुकीवरील व्याजात 1 कोटी 13 लाख 77 हजार 754 रुपये, इत्तर उत्पन्नात 3 लाख 68 हजार 434 रुपये, जनावरांच्या बाजारात 59 हजार 985 रुपये, मांजरी बाजार 41 लाख 3 हजार 649, खडकी बाजार 3 लाख 84 हजार 554 रुपये,
उत्तमनगर येथील बाजाराच्या उत्पन्नात 9 हजार 506 रुपयांची घट अशी एकूण उत्पन्नात 5 कोटी 44 लाख 28 हजार 197 रुपयांची घट झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले. या वेळी सभापती प्रकाश जगताप, माजी उपसभापती शशिकांत गायकवाड, सहसचिव घनश्याम जेधे आदी उपस्थित होते.
हंगामात काही काळ दर वाढतात, तर काही काळ कमी होतात. मात्र, मागील आर्थिक वर्षात कांदा-बटाटा आणि लसणाचे दर एकदाही वाढले नाहीत. उलट नेहमीच्या तुलनेत दर कमी राहिले. त्यामुळे कांदा, बटाटा विभागातील उत्पन्नात घट झाली. अन्य विभागातही घट झाली असून, चालू वर्षांत उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न करू.प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती