Ambegaon Milk Adulteration Investigation AI Photo
पुणे

Ambegaon Milk Adulteration | आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणातील 'म्होरक्या'चा शोध कधी?

तपासाचा अहवाल पोलीस -'एफडीए' दोघेही लपवताहेत; बड्या दूध प्रकल्पांची नावे आल्याने प्रकरण थंडावले

पुढारी वृत्तसेवा

Ambegaon Milk Adulteration Investigation

मंचर : आंबेगाव तालुक्यातील गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना पकडून जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. या प्रकरणाचा तपास अहवालही पोलिसांनी 'एफडीए' ला पाठवलेला आहे, तरीही ते कारवाई करत नाहीत. पोलीस आणि 'एफडीए' तो अहवालही जाहीर करण्यास तयार नाहीत.काही बड्या दूध प्रकल्पांची नावे यामध्ये आल्याने प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्थात 'म्होरक्या' कोण? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मुख्य आरोपीचे नाव जाहीर करण्यास पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून विलंब का होत आहे? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

मंचर येथे ५ जुलै रोजी दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आत्तापर्यंत ३६ आरोपींपैकी त्यातील २४ जणांना यापूर्वकाळात अटक केली, तर १२ जण अद्यापही फरार आहेत. चौकशीदरम्यान भेसळयुक्त दूध कोणत्या डेअऱ्यांना पुरवले जात होते, याबाबत महत्त्वाची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहवाल तयार करून तो अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडे माहिती आणि पुरावे उपलब्ध असल्याची चर्चा असताना संबंधित डेअऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई का झालेली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे यामागे राजकीय अथवा वरिष्ठपातळीवरील दबाव आहे का? अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

दूध हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अत्यावश्यक खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे तपासातील प्रत्येक बाब पारदर्शकपणे समोर यावी, अशी मागणी होत आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आलेल्या कारवाईतील आरोपींची नावे आणि दूध भेसळ करणाऱ्या डेअऱ्यांची नावे, याबाबत प्रशासनाची अधिकृत माहिती मांडण्यासाठी होणारा विलंब, याबाबत नागरिकांच्या मनामध्ये संशय बळावत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT