पुणे विमानतळावरून 2024 मध्ये झालेल्या विमानोड्डाणांची संख्या 67,484 इतकी होती, ती 2025 मध्ये वाढून 70,992 वर पोहचली आहे. ही वाढ अंदाजे 5.1 टक्के इतकी आहे. विमानांच्या संख्येसोबतच प्रवाशांच्या आकड्यानेही नवी उंची गाठली आहे. 2024 मधील 10.23 दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत 2025 मध्ये तब्बल 10.86 दशलक्ष प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला असून, ही 6.1 टक्क्यांची वाढ दर्शविते. विशेष म्हणजे, नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होतानाच ही वाढ साध्य करण्यात आली आहे.
कार्गो वाहतुकीत 23.8 टक्क्यांची मोठी वाढ
पुणे हे राज्याचे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्र असल्याने येथील मालवाहतुकीवर विशेष भर दिला जात आहे. 2024 मध्ये 40,149.6 मेट्रिक टन असलेली कार्गो वाहतूक 2025 मध्ये 49,718.7 मेट्रिक टनापर्यंत वाढली. ही 23.8 टक्क्यांची भरघोस वाढ पुण्याच्या औद्योगिक विकासाला गती देणारी ठरली. यामध्ये प्रामुख्याने ऑटो पाट्र्स (30 टक्के), औषधे आणि लस (30 टक्के) आणि नाशवंत वस्तू (25 टक्के) यांचा मोठा वाटा आहे, अशी माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.
विमानतळावर व्यावसायिक वाढ
विमानतळावरील व्यावसायिक दालनांची संख्या 28 वरून 83 पर्यंत वाढविण्यात आली असून, यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर झाला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनात पुणे विमानतळाने हे यश संपादन केले असून, भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता पुणे विमानतळ आता अधिक सक्षम झाले आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
रॅकिंगमध्येही घेतली आघाडी
जागतिक मानांकन आणि सुविधा प्रवाशांच्या वाढत्या पसंतीमुळे जागतिक स्तरावरील ‘एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी’ रँकिंगमध्ये पुणे विमानतळाने 59व्या क्रमांकावरून 56व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.