पुणे: सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाला असून, त्याचे थेट चित्र आता पुणे विमानतळावर पाहायला मिळत आहे. पर्यटनासाठी बाहेर पडणारे नागरिक आणि सुट्यांसाठी घरी परतणारे विद्यार्थी यांच्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठी रेलचेल वाढली आहे. एरवी दैनंदिन 15 हजार असणारा प्रवाशांचा आकडा आता 18 हजारांच्या वर पोहोचला आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सरासरी 3 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी हा आकडा अधिक वाढत असून, प्रामुख्याने पर्यटन स्थळे असलेल्या शहरांसाठी विमानांचे बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या गर्दीची प्रमुख कारणे
शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्याने कौटुंबिक सहलींचे प्रमाण वाढले आहे.
गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांकडे पुण्यातून जाणारा ओघ मोठा आहे.
सुट्यांच्या काळात आयटी प्रोफेशनल आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विमान प्रवासाला पसंती देत आहेत.
पुणे विमानतळावर सध्या उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज सरासरी 15 हजार प्रवासी विमानतळावरून जातात; मात्र, आता हा आकडा 18 हजारांच्या घरात गेला आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विमानतळ प्रशासनाकडून सुरक्षा तपासणी आणि इतर सुविधांचे चोख नियोजन करण्यात आले आहे.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ