एकेका नेमबाजाची तपासणी चालली अर्धा ते पाऊण तास
स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाया जाण्याची शक्यता
पुणे : पुणे विमानतळावर विमान कंपनीच्या सुरक्षा तपासणी प्रक्रियेला विलंब झाल्याचा फटका पुण्यातील सहा राष्ट्रीय नेमबाजांना बसला. नेमबाजांकडे काडतूस आणि उपकरणे असल्याने काटेकोर तपासणी करण्यात वेळ गेल्यामुळे या पाच नेमबाजांचे विमान चुकले. ही घटना मंगळवारी (दि. 17 सप्टेंबर) सायंकाळी पुणे विमानतळावर घडली. (Latest Pune News)
नेमबाज अनुश्री कालुथे, श्रीषा पाटील, रुद्र क्षीरसागर, अदिती धाबडे, राजवर्धन हगावणे आणि मनवा कदम हे सहा नेमबाज या स्पर्धेला जाणार होते. तपासणी प्रक्रियेला विलंब लागल्याने यापैकी केवळ मनवा ही एकटीच पुणे-गोवा या विमानाने जाऊ शकली. मात्र, तिची रायफल विमानतळावरच राहिली. उर्वरीत पाच खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच ठिकाणी अडकून पडले. पहाटे उशिरापर्यंत या खेळाडूंना विमानतळावर प्रतीक्षेत थांबावे लागले. याबाबत नेमबाजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
विमानाचे उड्डाण चुकेल, असे सांगितले जात असताना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून दिरंगाई केल्याचा आरोप रुद्र क्षीरसागर या खेळाडूने केला. तसेच एरवी इतर ठिकाणी स्पर्धेसाठी जाताना पिस्तुल, रायफलची तपासणी दहा ते पंधरा मिनिटात होत असताना या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना एका नेमबाजाची तपासणी करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लावला असल्याचेही इतर नेमबाजांनी सांगितले. याबाबत विजय कुंभार म्हणाले, पुणे विमानतळावर ‘अकासा एअर’च्या गैरव्यवस्थापनामुळे वेस्ट इंडिया शुटिंग चॅम्पियनशिपसाठी गोव्याला जाणार्या सहा आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाजांचे विमान उड्डाण चुकले. वारंवार सामान / रायफल क्लिअरन्स गोंधळामुळे तास वाया गेला. आता, हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी गमावू शकतात.
‘नेमबाजांच्या प्रवासी सामानात असलेली पिस्तुल, रायफल आणि इतर उपकरणांमुळे सुरक्षा तपासणी प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे विमान चुकले आणि गैरसोय झाली. आमचे स्थानिक पातळीवरील कर्मचारी आवश्यक ती मदत करून पर्यायी प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे नेमबाज त्यांच्या स्पर्धेपूर्वी वेळेत पोहचण्यासाठी नियोजन करत आहोत,’ असे ‘अकासा’ कंपनीतर्फे सांगण्यात आले.