पुणे: भारतीय वायुसेनेने पुणे विमानतळ प्रशासनाला 13 एकर जागा देण्याची तयारी दाखवली असून, ही जागा येत्या महिनाभरात पुणे विमानतळ प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील 5 पार्किंग बे (विमाने उभी करण्याची जागा) वाढणार आहेत. सध्या पुणे विमानतळावर 10 पार्किंग बे आहेत. पाच वाढल्यामुळे येथे 15 पार्किंग बे होतील, परिणामी, विमानप्रवास वेगवान होणार आहे.
येत्या महिनाभरात या जागेचा ताबा विमानतळ प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे. या जागेमुळे विमानतळाच्या परिचालन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. विमाने उभी करण्यासाठी नव्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध होतील. यामुळे आगामी काळात विमानांना हवेत घिरट्या घालाव्या लागणार नाहीत, पर्यायाने इंधन आणि वेळ वाचणार आहे. पार्किंगची सुविधा वाढल्याने भविष्यात पुण्यातून अधिक नवीन शहरे जोडली जाऊ शकणार आहेत.
विमानांचे आगमन आणि उड्डाण वेळेवर झाल्यामुळे टर्मिनलमधील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विमानतळावर विमानांची संख्या वाढत होती. मात्र, पार्किंगसाठी पुरेशी जागा असल्यामुळे विमान कंपन्यांना मर्यादा येत होत्या. हवाई दलाने दर्शवलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे पुण्याच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.