पुणे: पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल लवकरच अधिक प्रशस्त होणार असून, जुन्या टर्मिनलच्या नूतनीकृत भागाचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत सुरू होणार आहे. या माध्यमातून नवीन टर्मिनलच्या एरियामध्ये तब्बल एकतृतीयांशने वाढ होणार असून, यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. (Latest Pune News)
जुने टर्मिनल नवीन टर्मिनलला जोडण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, जुन्या टर्मिनलच्या अरायव्हल गेट असलेल्या भागाचे, नूतनीकरणाचे एकतृतीयांश काम पूर्ण झाले आहे. आवश्यक त्या सर्व कागदोपत्री आणि तांत्रिक मान्यता मिळाल्यावर डिसेंबर 2025 अखेर जुन्या टर्मिनलचा एकतृतीयांश भाग नवीन टर्मिनलला जोडला जाणार असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दै. ‘पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
डिसेंबरची डेडलाइन; फक्त इलेक्ट्रिकल कामे बाकी
नवीन टर्मिनलच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने हे एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या जुन्या टर्मिनलच्या एकतृतीयांश भागातील इलेक्ट्रिकल (विद्युत) कामे वेगाने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
सर्व तांत्रिक कामे आणि आवश्यक त्या शासकीय मान्यता मिळाल्यावर लगेचच डिसेंबर 2025 अखेरीस जुन्या टर्मिनलचा हा नूतनीकरण केलेला भाग नवीन टर्मिनलला जोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही विमानतळ प्रशासनाने सांगितले.
प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद सेवा पुरवणे, ही आमची प्राथमिकता आहे. जुन्या टर्मिनलच्या भागाचे नूतनीकरण लक्ष्यानुसार पूर्ण होत आहे. यातील एकतृतीयांश भागाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. उर्वरित तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया डिसेंबर 2025 महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या एकत्रीकरणामुळे नव्या टर्मिनलची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. प्रवाशांच्या वाढत्या संख्येला प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि त्यांना गर्दीमुक्त अनुभव देण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरेल.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ