पुणे: तंत्रज्ञानाच्या युगात पुणे विमानतळाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ‘मुक्स रोबोटिक्स’ या खासगी कंपनीने विकसित केलेला भारताचा पहिला ह्युमनॉइड रोबोट ‘स्पेसियो एम 1’ आता थेट पुणे विमानतळाच्या टर्मिनलवर तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करणारा हा रोबोट सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.
विमानतळ टर्मिनलवरील हा केवळ एक यंत्रमानव नसून, त्यामध्ये प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता आहे. प्रवाशांना विमानतळावरील विविध ठिकाणांचा मार्ग दाखवणे. प्रवाशांच्या शंकांचे रिअल टाइममध्ये निरसन करणे, गर्दीच्या टर्मिनल्समध्ये स्वतःहून वावरणे आणि प्रवाशांना मदत करणे, अशी या रोबोटची वैशिष्ट्ये आहेत. पुणे विमानतळावर तंत्रज्ञानाचा हा प्रयोग यशस्वी होतो का, याकडे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. दहा दिवस हा रोबोट चाचणीसाठी विमानतळावर असणार आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे विमानतळावर आणण्यात आलेला हा रोबोट सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. एका खासगी कंपनीमार्फत पुढील 10 दिवस या रोबोटची टर्मिनलमध्ये चाचणी घेण्यात येईल. प्रवाशांचा प्रतिसाद आणि रोबोटची कार्यक्षमता तपासूनच, त्याला कायमस्वरूपी विमानतळावर ठेवायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. सध्या हा रोबोट प्रवाशांशी उत्तम प्रकारे संवाद साधत आहे.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ