Hydroponic Ganja Pudhari
पुणे

Pune Drug Bust: पुणे विमानतळावर 77 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई; थायलंडहून आलेला 76 किलो गांजा पकडला, आंतरराष्ट्रीय तस्करीचा भंडाफोड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे विमानतळावरील मालवाहतूक विभागात सीमाशुल्कच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 76 किलो 580 ग््रॉम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 77 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी नवी मुंबईतील व्यावसायिक समीर सुरेश अष्टेकर (वय 58) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवघ्या चार दिवसांपूर्वी ‌‘पुढारी‌’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. थायलंडमध्ये अलीकडेच लागू झालेल्या निर्बंधांमुळे गांजाच्या तस्करीत वाढ होत असल्याची बातमी दैनिक ‌‘पुढारी‌’ने प्रसिद्ध केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता थायलंडमधूनच कोट्यवधींचा गांजा पुण्यात उतरवण्याचा प्रयत्न उघड झाल्याने आंतरराष्ट्रीय रॅकेट किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट झाले आहे.

‌‘संत्र्याच्या तुकड्यां‌’आड लपवलेला घातक खेळ

सीमाशुल्क विभागाला थायलंडवरून आलेल्या 45 बॉक्सच्या मालाबाबत संशय आला. कागदपत्रांवर हा माल ‌‘मँडरिन संत्र्याचे तुकडे‌’ असा दाखवण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांना काही तरी संशयास्पद वाटल्याने पंचांच्या उपस्थितीत तपासणी सुरू करण्यात आली. एक्स-रे तपासणीतच मालातील विसंगती स्पष्ट झाली. बॉक्स उघडल्यावर त्यात चांदी रंगाचे डबे आणि त्यामध्ये हवाबंद पिशव्या आढळल्या. या पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा, तीव वासाचा पदार्थ भरलेला होता. चाचणी घेतली असता तो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व 45 बॉक्स उघडले असता एकाच प्रकारे पॅकिंग केलेल्या 268 पिशव्या सापडल्या. एकूण वजन 76 किलो 580 ग््रॉम इतके भरले. हा संपूर्ण साठा सात वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून सील करण्यात आला होता. थायलंडहून थेट भारतात गांजाची तस्करी करण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अष्टेकर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

कस्टम विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, या आंतरराष्ट्रीय तस्करी साखळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पुण्यात उतरवण्याचा प्रयत्न झाल्याने विमानतळावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीमाशुल्क विभागाच्या या कारवाईमुळे मात्र मोठ्या तस्करीला बेक लावण्यात यश आले आहे.

‌‘ओझविन‌’ कंपनीचा धागा

तपासात हा माल ‌‘ओझविन मल्टीसोल्यूशन्स‌’ या कंपनीच्या नावावर आयात करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. समीर अष्टेकर आणि शिप्रा झोडे हे या कंपनीचे संचालक असल्याचे समोर आले. चौकशीत अष्टेकर याने या व्यवहारात त्याला रवि सोनार याने मदत केल्याचेही उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT