Pune airport security exercise
पुणे : पुणे विमानतळावर शनिवारी (दि. 10) रात्री संपूर्णपणे ब्लॅक आउट करण्यात आले. यामुळे विमान प्रवासी काहीसे गडबडले, मात्र थोड्यावेळाने ही ब्लॅकआउटची रंगीत तालीम असल्याची माहिती समजल्यावर त्यांनी विमानतळ प्रशासनाला सहकार्य केले.
पुणे विमानतळ प्रशासनाने शनिवार रात्री ८:२५ ते ८:४५ या वेळेत पूर्वनियोजित ब्लॅक आउट (आपत्कालीन वीजपुरवठा खंडित) करण्याची रंगीत तालीम घेतली. तब्बल वीस मिनिटे पुणे विमानतळाची सर्व लाईट घालवण्यात आली होती. वीस मिनिटानंतर लाईट पुन्हा सुरू करण्यात आली अन पुणे विमानतळावरील ही ब्लॅकआऊटची चाचणी यशस्वी झाली.
भविष्यात उद्भवणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विमानतळ प्रशासन किती सज्ज आहे, हे तपासणे, हे या तालमीचा मुख्य उद्देश होता.
या 'सिम्युलेटेड ब्लॅकआऊट ड्रिल' च्या तयारीसाठी विमानतळ प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली होती. विमान कंपन्या, हवाई वाहतूक नियंत्रण विभाग आणि इतर संबंधित संस्थांना या तालमीची पूर्वसूचना देण्यात आली होती. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना या तालमीचे उद्दिष्ट आणि ती कशा प्रकारे पार पाडली जाईल, याची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
महत्त्वाचे म्हणजे, विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमध्ये प्रवाशांना या तालमीबद्दल वेळोवेळी उद्घोषणा करून माहिती देण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास तातडीने उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली होती.
दरम्यान, पुणे विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना यावेळी पुढील २० ते ३० मिनिटांसाठी आकाशातच घिरट्या घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. या काळात प्रवाशांना शांत ठेवण्यासाठी आणि त्यांना घडणाऱ्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी नियमितपणे उद्घोषणा करण्यात येत होत्या.