Pune Air Show Pudhari
पुणे

Pune Air Show: पुण्याच्या आकाशात सुखोईचा थरार; सूर्यकिरण आणि सारंगच्या हवाई कसरतींनी जिंकली मने!

‘नो युअर आर्म्ड फोर्सेस’ उपक्रमांतर्गत एअर शो; लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके पाहून विद्यार्थी भारावले, म्हणाले ‘मोठेपणी आम्हीही हवाई दलात जाणार!’

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आकाशात अचानक घुमलेली लढाऊ विमानांची गर्जना, क्षणार्धात वेगाने आकाश कापत जाणारे सुखोई आणि एकमेकांना खेटून हवेत झेपावणारी सूर्यकिरण टीमची विमाने... कधी आकाशात रंगांची उधळण, तर कधी थरारक हवाई कसरती! अशा रोमांचकारी वातावरणात शुक्रवारी पुणेकरांना भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडले. सुखोई एमकेआय-३०, सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि सारंग हेलिकॉप्टर टीमने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

भारतीय हवाई दलाच्या ‘एअरफोर्स डे’निमित्त ‘नो युअर आर्म्ड फोर्सेस’ या उपक्रमांतर्गत विशेष एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संरक्षण दलांचे सामर्थ्य, वैमानिकांचे कौशल्य आणि हवाई दलाची कार्यक्षमता नागरिकांना जवळून अनुभवता यावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.

या एअर शोमध्ये सुखोई एमकेआय-३० या लढाऊ विमानाने सादर केलेल्या हवाई प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. आकाशात वेगवान झेप घेत विविध कसरती सादर करताना विमानाच्या सामर्थ्याची प्रचिती आली. त्यानंतर सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या विमानांनी शिस्तबद्ध आणि अचूक समन्वयातून सादर केलेल्या हवाई कसरतींनी उपस्थितांना थक्क केले. एकाच वेळी अनेक विमाने आकाशात विविध आकृत्या साकारत असताना उपस्थित नागरिकांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या.

सारंग हेलिकॉप्टर टीमनेही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकांतून उपस्थितांची दाद मिळवली. हेलिकॉप्टरचे अचूक नियंत्रण, हवेतल्या कसरती आणि वैमानिकांमधील समन्वय पाहण्याचा अनुभव पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमामुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य आणि वैमानिकांचे धाडस अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. आकाशातील या थराराने उपस्थितांच्या मनात देशाच्या संरक्षण दलांविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ केली.

‘मोठेपणी आम्ही सुद्धा हवाईदलात भरती होणार!’

आकाशात अचानक घुमणारा विमानांचा आवाज, क्षणार्धात उंची गाठणारी लढाऊ विमाने आणि आकाशात मनमोहक कसरती सादर करणारे सूर्यकिरण पथक... हे थरारक दृश्य पाहताना विद्यार्थ्यांच्या नजरा आकाशावर खिळल्या होत्या. चित्रपट आणि पुस्तकांमध्ये पाहिलेली विमाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर झेपावताना पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हवाईदलाच्या जवानांचे कौशल्य आणि शिस्त पाहून मोठेपणी आपणही हवाईदलात सहभागी व्हायचे, अशी इच्छाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

लोहगाव येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर आयोजित ‘नो युअर आर्म्ड फोर्सेस’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हवाई दलाची ताकद, कार्यपद्धती आणि देशाच्या सुरक्षेतील महत्त्वाची भूमिका जाणून घेण्याची संधी मिळाली. हवाईदलात कोणत्या प्रकारची विमाने आहेत, त्यांचा वापर कशासाठी केला जातो, त्यांची कार्यपद्धती कशी असते तसेच देशाच्या सुरक्षेसाठी हवाईदलाने राबविलेल्या विविध मोहिमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानांची आकाशातील झेप, सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हेलिकॉप्टरची कौशल्यपूर्ण उड्डाणे विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. विमानांच्या वेगवान हालचाली, आकाशातील अचूक रचना आणि वैमानिकांचे कौशल्य पाहून विद्यार्थी भारावून गेले. हवाईदलातील जवानांना मिळणारे प्रशिक्षण, त्यांच्यातील शिस्त आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची क्षमता, याविषयीही विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखविली.

विद्यार्थ्यांनी ‘एअर शो’चा मनमुराद आनंद घेतला

विद्यार्थ्यांना हा अनुभव घेता यावा, यासाठी शिक्षकांनीही विशेष पुढाकार घेतला. शारदाबाई पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे वसंत बोरुडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना हवाईदलाची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. मुलांनी एअर शोचा मनमुराद आनंद घेतला. या अनुभवामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला असून, देशभक्तीची भावनाही अधिक दृढ झाली.’

भारतीय हवाई दल दिवस आणि ‘नो युअर आर्म्ड फोर्सेस’ या उपक्रमाअंतर्गत पुणे विमानतळावर शुक्रवारी एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये सुखोई, सूर्यकिरण विमाने आणि सारंग हेलिकॉप्टर एरोबॅटिक टीमने चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून दिले. या शोसाठी शहरातील विविध शाळांमधील मुलांना बोलावण्यात आले होते. त्यांना या शोच्या माध्यमातून हवाईदलाची ओळख करून देण्यात आली. भविष्यात देशातील सशस्त्र दलांना या माध्यमातून चांगले अधिकारी मिळतील अशी आशा आहे.
एअर कमोडोर सतबीर सिंह राय, प्रमुख एअरफोर्स स्टेशन पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT