आशिष देशमुख
पुणे: शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी यंदा सतत हवेची गुणवत्ता खराब, अतिखराब आणि गंभीर गटांत जात आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते वायुप्रदूषणाला हवेच्या वरच्या थरात जाण्यास जागाच मिळत नसल्याने हा प्रकार वाढला आहे. त्यामुळेच शहरात श्वसनविकारांसह दीर्घकाळ सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे.
नोव्हेंबरपर्यंत शहरातील हवा शुद्ध गटांत होती. मात्र, डिसेंबर उजाडताच वातावरणातील बाष्प कमी झाले. वातावरणातील कोरडेपणा वाढताच वाहनप्रदूषणामुळे हवा वेगाने अशुद्ध होण्यास सुरुवात झाली. परिणामी दाट लोकवस्ती, दाट वाहनकोंडीची ठिकाणे गंभीर गटात जात आहेत.
हवेची गुणवत्ता सतत खराब ते गंभीर
हवेची गुणवत्ता मायक्रो ग््रॉम प्रतिघनमीटर या एककात मोजली जाते. म्हणजे मुंगीच्या आकारा एवढ्या जागेत इंधन ज्वलनातून निघाणारे धुलीकण 2.5 व 10 पीएम किती प्रमाणात आहेत हे दर्शवले जाते.
सध्या शहराची हवेची गुणवत्ता सतत 180 ते 300 च्या जवळपास जात आहे. यात मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, चिंचवड, आळंदी फाटा, भूमकर चौक येथे ही पातळी सतत खराब ते गंभीर गटात जात आहे.
शहरात वाहन इंधन ज्वलनातून प्रदूषण वाढत आहेच. यातून निघणारे सूक्ष्म 10 व अतिसूक्ष्म 2.5 धुलीकण वाढले आहेत. तसेच शहरात दाट लोकवस्ती अन् दाट वाहनकोंडी असल्याने हवेतील प्रदूषण वरच्या थरात जाण्यास जी जागा लागते तशी मिळत नसल्याने प्रदूषित हवेची कोंडी होत आहे. त्यामुळे हवा सतत खराब ते गंभीर गटात गणली जात आहे.डॉ. सचिन गुडे, विभागप्रमुख, आयआयटीएम, पुणे