Pune Car Accident Bund Garden: पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एक कार अचानक नियंत्रण सुटून मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन आदळली. धडकण्याचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या परिसरात काही क्षणांतच लोकांची गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवले.
या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी सांगितले, “सकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास एक कार बंडगार्डन मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन धडकली. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे आणि अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे.”
कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अतिवेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे कोरेगाव पार्क परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.