Accident helper reward
पुणे : रस्त्यावर अपघात झाला आणि कोणीतरी मदतीसाठी धावून आलं, तर आपल्याला किती दिलासा मिळतो ! अशा संकटसमयी मदतीचा हात देणार्या व्यक्तींना शासनाने ‘राह-वीर’ योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. आता या देवदूतांच्या कार्याची दखल घेतली जाणार असून, प्रोत्साहन म्हणून त्यांना 25 हजार रूपये बक्षिस दिले जाणार आहे. समिती मार्फत त्याची योग्य तपासणी केली जाणार असून, तिचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून बक्षिस संदर्भातील कार्यवाही केली जाणार आहे.
लोकांनी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यावे आणि अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे. अनेकदा वेळेवर मदत न मिळाल्यामुळे जखमी व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अन त्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. मात्र, या नव्या ‘राह-वीर’ योजनेमुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते अधिक जागरूकतेने मदतकार्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील माहितीचे पत्र नुकतेच परिवहन आयुक्त कार्यालय,मुंबई आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
शासन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे, ही समिती अशा देवदूतांची निवड करेल. तसेच, राज्य स्तरावर देखील एक देखरेख समिती असेल, ती या योजनेच्या कार्यावर लक्ष ठेवेल.
1.अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणार्या व्यक्तीस 25 हजार रुपयांचे पारितोषिक
2.जखमी व्यक्तीला ‘गोल्डन अवर’मध्ये (अपघातानंतरचा पहिला तास) रुग्णालयात पोहोचवणारे ठरतील, योजनेस पात्र जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.
3.‘राह-वीर’ योजना एक स्तुत्य उपक्रम आहे, जो आपल्या समाजात असलेल्या माणुसकीच्या भावनेला आणखी दृढ करेल.
ही योजना खूप चांगली आहे. यामुळे लोकांना अपघातग्रस्तांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल आणि जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवता येतील. आम्ही या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करू आणि लोकांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू.अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे