Pune Navale Bridge Accident Traffic Jam Death: नवले पुलावर आज सकाळी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. पुणे-सातारा महामार्गावरील या पुलावर तीन मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची जोरदार धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही वाहनचालक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेली मालवाहतूक वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातामुळे नवले पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पुण्याकडे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे.
नवले पूल हा आधीपासूनच अपघातग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या परिसरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.