पुणे: आठ कोटीच्या लाचेची मागणी करून, तीस लाख रुपेय घेताना शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक करण्यात आलेल्या अवसायक (लिक्विडेटर) आणि लेखापरिक्षकाला (ऑडीटर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. धनकवडीतील एका सोसायटीतील नवीन सभासदाना शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी, तसेच भविष्यात होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला सहकारी सोसायटीची जागा देण्यासाठी या दोघांनी तब्बल आठ कोटीच्या लाचेची मागणी केली होती. एवढ्या मोठ्या लाचेची मागणी करण्यात आल्याने सहकार विभागात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.5) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शनिवार पेठेत ही कारवाई करण्यात आली.
विनोद माणिकराव देशमुख (अवसायक, वय ५०, रा. सिंहगड दर्शन सोसायटी, धायरी फाटा), भास्कर राजाराम पोळ (लेखापरिक्षक, वय ५६, रा. सुश्रृत रेसीडन्सी, नऱ्हे) अशी दोघा लाचखोरांची नावे असून, त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, एका 61 वर्षीय व्यवसायिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देशमुख आणि पोळ या दोघांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तक्रार प्राप्त होताच एका दिवसात पडताळणी करून एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांचे शनिवार पेठेत कार्यालय आहे. धनकवडीतील एकता सहकारी सोसायटीचे ते नवीन सभासद आहेत. या सोसायटीत तक्रारदारासह ३२ नवीन सभासद आहेत. जुन्या सभासदांकडून या सोसायटीचे शेअर्स नवीन सभासदांनी खरेदी केले होते. या कारणावरुन जुन्या आणि नवीन सभासदात वाद निर्माण झाला होता. हा वाद सहकार विभागाकडे गेल्याने सोसायटीत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासकाने मूळ सभासद आणि नवीन सभासदांची चैाकशी करुन एक अहवाल सहकार विभागाकडे सादर केला होता.
तक्रारदार व्यावसायिक आणि अन्य ३२ नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालिन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे शेअर्स सर्टिफिकेट मिळावेत म्हणून अर्ज केला होता. मात्र, पोळ यांनी तक्रारदार व्यावसायिक यांचा अर्ज प्रलंबित ठेवला. अन्य ३२ नवीन सभासदांचे अर्ज निकाली काढले. तक्रारदार सुनावणीसाठी उपलब्ध न झाल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांनी पोळ यांची भेट घेतली. शेअर्स सर्टिफिकेट देण्याबाबत चौकशी केली. तेव्हा तक्रारदारासह अन्य नवीन ३२ सभासदांना प्रमाणपत्र देण्यासाठी पोळ याने स्वतःसाठी तसेच सद्या सोसायटीचे अवसायक (लिक्विडेटर) म्हणून नेमणूकीस असलेले विनोद देशमुख यांच्यासाठी तीन कोटींची लाच मागितली असे तक्रारीत म्हटले होते.
तसेच भविष्यात सोसायटीच्या लिलाव प्रक्रियेत तक्रारदार सांगतील, त्या व्यक्तीस जागा मिळवून देऊ, असे सांगून पोळ याने आणखी पाच कोटी रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे एकूण आठ कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. पहिल्या हप्त्यापोटी पोळ याने ३० लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंभक विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तांत्रिक पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास देशमुख हे स्वतः तक्रारदारांच्या शनिवार पेठेतील कार्यालयासमोर आले. त्यानंतर तक्रारदाराकडे लाचेबाबत सकारात्माक बोलणी करून ठरलेल्या कामासाठी ॲडव्हान्स (पहिला हप्ता) म्हणून 30 लाखाची लाच देशमुख आणि पोळ या दोघांनी पंचासमक्ष स्वीकारली. त्याचवेळी तेथे असलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजिय पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीता मिसाळ आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.