पुणे

पुणे: बारामतीत शासकीय विभागाच्या त्रासातून शेतकऱ्याने जीवन संपविले; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

अविनाश सुतार

बारामती: पुढारी वृत्तसेवा : जलसंपदा, महावितरण व पोलिस विभागाच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले. हनुमंत पांडुरंग सणस (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटे येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून जीवन संपविल्याचे कारणे नमूद केली आहेत.

सणस यांनी दि. २६ फेब्रुवारीरोजी मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकासह संबंधित शासकीय कार्यालयांना निवेदन पाठवले होते. त्यात त्यांनी महावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, जलसंपदा विभागाची वडगाव निंबाळकर शाखा व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडून त्रास होत असल्याचे म्हटले होते.

लाटे गावच्या हद्दीत गट क्रमांक १४१ मध्ये सणस यांचे निरा नदीलगत क्षेत्र आहे. या क्षेत्रातून कोणत्याही व्यक्तीला पाणी उचल परवाना जलसंपदा विभागाने दिलेला नाही. तरीही महावितरणने आठ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली होती. सणस हे या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रामधून ये-जा करण्यास मज्जाव करत होते. त्यामुळे त्यांच्याकडून सणस यांना दमबाजी केली जात होती. बेकायदेशीर मोटार पंपधारक हे त्यांना तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशी धमकी देत होते. सणस यांच्या मुलाकडून तसे लेखी घेण्यात आले होते.

संबंधित विभागांकडून १५ मार्चच्या आत मला न्याय द्यावा, अशी मागणी सणस यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे केली होती. तसेच त्यानंतर मी माझे जीवन संपविणार असून त्याला महावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, वडगाव निंबाळकर जलसंपदा विभाग व वडगाव पोलिस ठाणे तसेच बेकायदेशीररित्या पाणी उचल करणारे लोक जबाबदार राहतील, असे त्यात नमूद केले होते. मात्र, या तक्रारीवर उचित कार्यवाही न झाल्याने सणस यांनी शनिवारी (दि. १३) जीवन संपविले. त्याआधी यासंबंधीची चिठ्ठी त्यांनी आपल्या खिशात ठेवली.

सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी मयताचे भाऊ जयवंत पांडुरंग सणस यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजित उर्फ सोपान घुले, अमर दत्तात्रय दुधाणे (रा. पुणे), मोहन उर्फ बजरंग शंकर कोळेकर, संभाजी महादेव खलाटे, प्रकाश बाबुलाल माने (रा. लाटे, ता. बारामती) यांच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी करत मानसिक त्रास देत हनुमंत यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT