Road Quality Pudhari
पुणे

Pune Cycle Track Project: पुण्यात ४५ कोटींच्या सायकल ट्रॅकच्या कामाचा दर्जा संशयात; पहिल्याच थरात रस्ता उखडला!

कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर डांबरीकरणानंतर खडी बाहेर; दुसरा थर टाकण्यापूर्वी गुणवत्ता तपासणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सायकल ट्रॅकच्या माध्यमातून शहरातील वाहतूकव्यवस्था आणि सायकलस्वारांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेकडून ४५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या निधीतून सुरू असलेल्या कामाचा दर्जा पहिल्याच टप्प्यात संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर डांबरीकरणाचा पहिला थर टाकल्यानंतरच रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी बाहेर येऊन भुगा पडल्यासारखी अवस्था झाली आहे. दुसरा थर टाकण्याचे काम अद्याप बाकी असतानाच पहिल्या थराची गुणवत्ता संशयास्पद ठरल्याने ४५ कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सायकल टूर पॅकेज क्रमांक चारअंतर्गत नॉर्थ मेन रोडवर हे काम सुरू आहे. डांबरीकरणासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. पहिल्या थरावरच खडी बाहेर येत असल्याने डांबराची पकड योग्य नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अद्याप दुसरा थर टाकायचा असतानाच रस्त्याची अशी अवस्था झाल्याने कामाच्या तांत्रिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिल्या थराची गुणवत्ता तपासून आवश्यक दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर दुसरा थर टाकून काम पूर्ण करण्याची घाई झाल्यास निकृष्ट कामावर केवळ वरवरची मलमपट्टी होण्याची शक्यता आहे. परिणामी, काही दिवसांतच रस्ता उखडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुसरा थर टाकण्यापूर्वी डांबरीकरणासाठी वापरलेले साहित्य, थराची जाडी आणि तांत्रिक मानकांनुसार काम झाले आहे का? याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

४५ कोटींच्या कामावर देखरेख कोणाची?

सायकलस्वारांसाठी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात कामाच्या दर्जाबाबत तक्रारी निर्माण होत असतील, तर कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सल्लागार आणि संबंधित अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम सुरू असताना अशा त्रुटी कशा राहिल्या? असा सवाल केला जात आहे.

संबंधित सल्लागार आणि त्या भागाची जबाबदारी असलेल्या रस्ते विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून कामाची तपासणी केली जाईल. कामात काही त्रुटी आढळल्यास तातडीने दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या जातील.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT