नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील पवना नदीकाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नव्याने उभारण्यात आलेले सिव्हेज पंपिंग स्टेशन (एसपीएस) अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच आहे. पंपहाऊस चालू न राहिल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे.
नियमित स्वच्छता करणे गरजेचे
पंपिंग स्टेशनमध्ये स्टॅण्ड बाय पंप उपलब्ध असतो. मात्र, वीज गेल्यानंतर दोन्ही पंप बंद पडण्याची शक्यता असते. तसेच, परिसराची स्वच्छता व देखभाल न केल्यास दुर्गंधी पसरू शकते. त्यामुळे पंपिंग स्टेशन सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पिंपळे गुरव येथील पवना नदीकिनारी मागील वर्षी येथील सिव्हेज पंपिंग स्टेशन उभारणीसाठी सुरुवात केली होती. यासाठी 3 हजार चौरस क्षेत्रफळात डाव्या बाजूला मेकॅनिकल स्क्रिन बेल्ट आणि बेल्ट कन्व्हेअरसाठी जागा वापरण्यात आली आहे. मध्यभागी पंपहाऊस आहे. तर, उजव्या बाजूला सब स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, विद्युत मिटरिंग पॅनेल उभारण्यात आले आहे. येथील संपूर्ण जागेत तारेचे कंपाउंड व गेट तयार करण्यात आले आहे.
पर्यावरण विभागाकडून उभारण्यात आलेल्या सिव्हेज पंपिंग स्टेशनच्या डाव्या बाजूला मेकॅनिकल स्क्रीन आणि बेल्ट कन्व्हेअर (कचरा बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त असलेली मशिनरी) हे पाइपलाइनमधून येत असलेला कचरा, प्लास्टिक, गाळ, काचेच्या बाटल्या, लोखंड आदी साहित्य सामग्री बाहेर काढण्याचे काम करण्याचे यंत्र उभारण्यात आले आहे. मध्यभागी 19 मीटर गोलाकार पंपहाऊस उभारण्यात आले आहे. यामध्ये 14 मीटर खोल मैलामिश्रित पाणी गोळा करण्यात येते. 5 मीटर उंची असलेल्या गोलाकारमध्ये आदी साहित्य सामग्री उभारण्यात आली आहे. 14 मीटर खोल असलेल्या गोलाकारात गोळा केलेले पाणी 30 एचपीच्या दोन पंपाच्या सहाय्याने मैलामिश्रित सांडपाणी पाइपलाइनद्वारे सांगवी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाकडे (एसटीपी प्लांट) पाठविण्यात येते. उजव्या बाजूला 100 केव्हीचे सब स्टेशन, 22 केव्ही ट्रान्सफॉर्मर, विद्युत मिटरिंग पॅनल उभारलेले पाहावयास मिळत आहेत.
एक वर्षापूर्वी येथील पंपहाऊस उभारण्यासाठी सुरुवात केली होती. सर्व मशिनरी उपलब्ध करून त्याची चाचणी पूर्ण केली आहे. या प्रकल्प उभारणीकरिता अंदाजे दोन कोटी खर्च केला आहे. उद्घाटनाचे अजून नियोजन केलेले नाही. लवकरच नियोजन करण्यात येईल.
– संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग
हेही वाचा :