

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील दारवली सुर्वेवाडी येथे जमीनीच्या कारणांवरून हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यास दमदाटी करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत प्रदिप शिवाजी बलकवडे (वय ३५) यांनी फिर्याद दिली.
देसाई यांच्या साथीदारांनी रस्त्याने ये जा करणाऱ्यांनाही तलावारी आणि कोयते दाखवून दहशत माजविली. याप्रकरणी पौड पोलिसांनी दहा ते पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पौड पोलिसांनी धनजंय देसाईसह, रमेश जायभाय, शाम सावंत, रोहीत (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या सह 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रदीप बलकवडे हे सुर्वेवाडी फाट्यावरील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी रमेश जायभाय, शाम सावंत, रोहीत यांच्यासह दहा ते पंधरा साथीदार आले. त्यांच्या हातात पिस्तुल, तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्या आदि हत्यारे होती. त्यांनी बलकवडे यांना घरातून बाहेर ओढले. तु तुझी जमीन धनंजय देसाई यांना लिहुन दिली नाहीस तर तुला व तु तुझ्या पुर्ण कुटूंबाला मारून टाकण्यास आम्हाला सांगितले आहे. अशी धमकी देऊन बलकवडे यांना बेदम मारहाण केली. यावेळी आरडाओरडा होताना रस्त्याने जाणाऱ्या लोकांची गर्दी जमली असता आरोपींनी बघणाऱ्यांच्या दिशेने तलवारी कोयते दाखवून तुम्ही येथे थांबला तर तुमचेही काही खरे नाही, असे ओरडत दहशत माजवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, हवेली उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवसभर पौड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ताफ्याची मोठी गर्दी होती. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव तपास करीत आहे.