Puja More Election Withdrawal Pudhari
पुणे

Pune Puja More BJP Election Withdrawal: सोशल मिडीयावर ट्रोलिंगनंतर भाजपा उमेदवार पुजा मोरे निवडणुकीतून मागे

जुना व्हिडिओ आणि राहुल गांधीसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुजा मोरे यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून भाजपने पूजा मोरे यांना उमेदवारी दिली. त्‍यांच्याकडे एबी फॉर्मही होता. मात्र त्‍यानंतर पुजा मोरे यांना वेगवेगळ्या पध्दतीने सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले. त्‍यामुळे पुजा मोरे यांनी अखेर माघार घेत आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात पुजा मोरे आणि धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने पूजा मोरे यांना प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी दिली होती. यानंतर पूजा मोरे यांच्यासह भाजपवर टिकेची झोड उठली. पूजा मोरे यांना याआधी घेतलेल्या भूमिका, त्यांच्या विधानांची आठवण करुन देत भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली. अखेर मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पुजा मोरे ढसाढसा रडल्या.

जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्‍ल्‍यावेळी पुजा मोरे यांनी व्‍हिडिओ व्‍हायरल केला होता. त्यामध्ये दहशतवाद्यांना धर्म नसतो, पर्यटकांना धर्म नसतो,' असं पूजा मोरे म्हणाल्या होत्या. पहलगाम हल्ला झाला, त्यावेळी त्या काश्मीरमध्येच होत्या. भाजपनं तिकीट दिल्यावर पूजा मोरे यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. या ट्रोलला उत्तर देताना पुजा मोरे म्‍हणाल्या, शहरात आल्यावर मला हिंदुत्व कळू लागलं. पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया मी लगेच दिलेली होती. पण नंतर मी या हल्ल्यातील पीडितांना भेटले. तेव्हा धर्म विचारुनच हा हल्ला झाल्याचं मला समजलं. त्यांना हिंदू म्हणूनच मारण्यात आलं होतं, ही बाबदेखील माझ्या लक्षात आली. पण माझा आधीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असल्याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधींसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण

पूजा मोरे यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबतचा भारत जोडो यात्रेतील फोटोही व्हायरल झाला. भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच फोटो व्हायरल झाला. त्यावरही पूजा मोरे बोलल्या. 'राहुल गांधी यांना भेटले, तेव्हा मी शेतकरी संघटनेत होते. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भातील निवेदन देण्यासाठी मी भारत जोडो यात्रा मराठवाड्यात आलेली असताना राहुल यांची भेट घेतली. कापसाला भाव मिळायला हवा. आयात धोरणावर काम करायला हवं, असं मी राहुल गांधींना सांगितलं होतं. तो फोटो आता व्हायरल केला जात आहे.

काम करत राहणार-पूजा मोरे

आपण अतिशय गरीब परिस्थितीतून वर आलो आहोत. माझ्या सोबत घडलेला प्रकार हे विरोधकांचं षडयंत्र आहे. भाजपनं मला संधी दिली. त्याबद्दल पक्षाचे आभार मानते. मी भाजपमध्ये काम केलं आहे. संघ परिवारानं मला समजून घेतलं. मी हिंदू आहे. हिंदुत्त्वासाठी काम करत राहीन. झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज असेल, तिथे काम करत राहीन, असे ही पूजा मोरे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT