पुणे: दिवे-पणत्यांच्या लख्ख प्रकाशात उजळलेला मंदिर परिसर, मनोहारी रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेत धार्मिक उपक्रमात सहभागी झालेल्या कस्तुरी सदस्या, असे चैतन्यपूर्ण आणि आनंदी वातावरण मंगळवारी (दि. २४) श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिरात पाहायला मिळाले. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेला दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित ‘दीपोत्सव २०२६ : तिमिराकडून तेजाकडे...’ या कार्यक्रमाचे. छत्रपती शिवाजीनगर येथील श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर देवस्थान परिसरात हा कार्यक्रम उत्साहात रंगला. कस्तुरी सदस्यांनी एकत्र येत आनंदाचे दीप प्रज्वलित केले अन् या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर उजळला. कस्तुरी सदस्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. डॉ. स्मिता जाधव यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या वेळी फुलांची उधळण करण्यात आली तसेच कस्तुरी क्लबच्या विभागप्रमुखांनी त्यांचे औक्षण करून ओटी भरली. डॉ. स्मिता जाधव यांनी देखील उपस्थित महिलांचे औक्षण करून आपुलकीने ओटी भरली. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी डॉ. स्मिता जाधव यांनी श्रीसूक्तपठण केले आणि त्यांनीही उत्साहाने दीप प्रज्वलित केले. या वेळी त्यांच्या हस्ते महाआरती झाली आणि शंखनादही करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित कस्तुरी सदस्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढल्या. दिवे-पणत्या प्रज्वलित करून परिसर प्रकाशमय केला. ‘मी कस्तुरी, माझी कस्तुरी, आम्ही सक्षम कस्तुरी’ अशा संदेशासह रेखाटलेल्या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाची सुरुवात समर्थ प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाच्या वादनाने झाली. ध्वज आणि ढाल-तलवार पथक पुणे यांच्या बहारदार वादनाने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर महिलांनी एकत्रितपणे दीप प्रज्वलित करीत त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला. श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट आणि समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि समर्थ प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कस्तुरी सदस्यांना अल्पोपाहार देण्यात आला. श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मंदिर देवस्थान ट्रस्टकडून वर्षभर विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दीपोत्सवाच्या उपक्रमालाही त्यांचे सहकार्य मिळते.
पुढारी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत भारतीय संस्कृती, सण-उत्सव आणि परंपरांचे जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून, प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा प्रकाश निर्माण करणारा उपक्रम आहे. महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा विशेष आनंद आहे.डॉ. स्मिता योगेश जाधव, अध्यक्षा, पुढारी कस्तुरी क्लब
पुढारी कस्तुरी क्लबसोबत आम्ही गेली चार वर्षे दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. आपली परंपरा-संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. यापुढेही कस्तुरी क्लबसोबत असे उपक्रम आयोजित करू.हनुमंत बहिरट, अध्यक्ष, श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट