पुणे : पुढारी वृत्तसेवा : रात्रीची पुण्यातील नाइट लाइफ तरुण, तरुणीवर बेतल्याचा प्रकार मध्यरात्री घडला. त्यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एककीकडे रात्री उशिरा दीडपर्यंत पब, हॉटेल चालवायला परवानगी मिळाली अन् दुसरीकडे घडलेल्या अपघातमुळे उशिरापर्यंत दिलेल्या परवानगीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परवानगी दिल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पुणे शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब असल्याने इतर राज्यांतील तरुणांचा ओढा या शहराकडे वाढत आहे. तसेच, पुण्यातील पब आणि हॉटेल हे तरुण-तरुणींचे आकर्षण ठरत आहेत. तेथे पुरविले जाणारे मद्य आणि त्यावर थिरकत असलेली तरुणाई, असे काहीसे चित्रे दिसून येते. अठरा वर्षांनंतरच्या तरुण, तरुणींचा ओढा पबकडे वाढत असताना दुसरीकडे अल्पवयीन मुलामुलींचाही ओढा पबकडे वाढला आहे.
श्रीमंत घरातील अल्पवयीन मुले मुख्यत्वेकरून पबमध्ये जातात. हजारो रुपये खर्च करतात. रात्री पबमधून पार्टीकरून बाहेर पडलेला बहुतांश अल्पवयीन मुलगा हा मद्यधुंद अवस्थेतच असल्याचे दिसून येते. मात्र, तो ज्या पबमध्ये गेला तेथे त्याला कोणी मद्य दिले, त्यांनी त्यांच्याकडे अल्पवयीन आहे का नाही, याबाबत विचारणा का केली नाही, त्यामुळे पबमध्ये सर्व्ह केले जाणार्या मद्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
त्याबरोबरच अशा गैरप्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे असे मद्य सर्व्ह करणार्या हॉटेलची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर रस्ता, कोरेगाव पार्क, मुंढवा परिसर, तसेच शहरात अन्य ठिकाणी पबचे पेव फुटले आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्या मद्यधुंद पार्ट्या, त्यानंतर केलेले बेदरकार ड्रायव्हिंगमुळे नागरिकांच्या जिवालादेखील धोका निर्माण झाला आला आहे. अनिस आणि अश्विनी हे त्याचेच एक उहारण आहे. अल्पवयीन मुलांना मद्य पुरविणे, रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, हॉटेल त्यानंतर बाहेर पडलेल्या तरुण- तरुणींच्या सुरक्षेचा देखील प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
कल्याणीनगर, विमाननगर, मुंढवा, कोरेगाव पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल व पब यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी येत असतात. उशिरापर्यंत सुरू असणार्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलिस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र, पब बंद झाल्यानंतर घरी जाताना अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत. रात्री दीडपर्यंतची डेडलाइन पब, हॉटेलकडून पाळली जात असल्याचे एकीकडे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, दुसरीकडून पबबाहेर पडलेल्या तरुण- तरुणांच्या सुरक्षेचे काय? या वेळी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी असतात का नसतात? तसेच, एवढा वेळ बाहेर पडणार्या तरुण, तरुणींवर पालकांचे खरेच लक्ष असते का?, या अपघाताच्या घटनेमुळे आता असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा