पुणे: पुणे महानगरपालिकेने शहरात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना लागू केली, तरी अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या परिसरांत अपुर्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.
तर, समाविष्ट झालेल्या 34 गावांना देखील योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने तातडीने या सर्व परिसरांत योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या. (Latest Pune News)
विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यावर सभापती शिंदे यांनी बैठक घेत वरील आदेश दिले. या वेळी आमदार योगेश टिळेकर, विधान मंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपसचिव नगरविकास प्रियंका छापवाले उपस्थित होते.
पुणे मनपाला 14 टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे, तर नवीन 34 गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना 21 टीएमसी उपलब्ध करून देण्याचा करार करावा. 2018 मध्ये सुरू झालेली ही पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण असून, तातडीने ती पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवावा, असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले.