पुणे

अभिमानास्पद : पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य पोलिस नेमबाजी स्पर्धा 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 1, वडाचीवाडी शूटिंग रेंज हडपसर आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडल्या. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील तीन खेळाडूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. शहर पोलिस दलातील तीन महिला खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त मुगुट पाटील, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते. रश्मी स्वप्नील धावडे (नेमणूक – विशेष शाखा) यांनी 10 मीटर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवले. पोलिस अंमलदार पूनम प्रकाश लांडे (नेमणूक – दिघी पोलिस ठाणे) यांनी 10 मीटर एअर रायफल या प्रकारात
रौप्यपदक मिळवले.

पोलिस अंमलदार परवीन मेहबूब पठाण (नेमणूक – वाहतूक शाखा) यांनी 50 मीटर रायफल प्रोन पोझिशन, 50 मीटर रायफल थ्री पोझिशन आणि 300 मीटर रायफल थ्री पोझिशन या तीन प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली. तर वडाचीवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या महिला व पुरुष एकत्रित स्पर्धेत 300 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदक मिळवले. या कामगिरीमुळे परवीन मेहबूब पठाण यांची ऑल इंडिया पोलिस नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस संघात निवड झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT