पुणेः पोरवाल रोड धानोरी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी पाच पीडितांची येथून सुटका करण्यात आली असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (दि.7) दुपारी ही कारवाई केली असून, विमानतळ पोलिस ठाण्यात स्पा मालक, मॅनेजर महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. किरण बाबूराव आडे उर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय 28, रा. राघे निवास, लेन क्र. 6, खराडी) असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली. (Latest Pune News)
पोरवाल रोड धानोरी परिसरातील आयजी धाम इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पंचांना घेऊन पथकाने लक्स स्पा सेंटरमध्य छापा टाकला असता तेथे वेश्या व्यवसाय करणार्या दोन अल्पवयीन मुलीसह पाच तरुणी आढळून आल्या.
स्पा मॅनेजर आरोपी महिला आडे ही पीडित तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. दरम्यान, सर्व मुलींना सुरक्षित पद्धतीने सोडवून बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे.
बाणेर, विमानतळ परिसरातून 18 मुलींची सुटका
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्या बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला. छापेमारीत एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी 10 पेक्षा जास्त मुली परदेशी नागरिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परिमंडळ 4 अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये, विमानतळ पोलिसांनी एका स्पा सेंटरवर छापा टाकून 16 मुलींची सुटका केली. त्यात 10 परदेशी आणि 2 भारतीय अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसर्या कारवाईत बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकत 2 मुलींची सुटका केली आहे. या ठिकाणीही मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही ठिकाणी मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू होता, यासाठी तरुणींना मोबदल्याचे आमिष दाखवून कामावर ठेवण्यात आले होते. काही पीडित तरुणींची परिस्थिती हलाखीची असून, त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्याचेही समोर आले आहे. रात्री उशिरा पर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांना स्पा सेंटरमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह पाच पीडित तरुणींकडून मसाजच्या नावाखाली देह विक्रयचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी आरोपी स्पा मॅनेजर महिलेला अटक केली आहे.- आशालता खापरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा