पुणे: सफाई कर्मचार्यांना त्यांच्या फडांविषयीची माहिती, सातव्या वेतन आयोगाचा फरक, समाविष्ट गावांतील सफाई कर्मचार्यांना भत्ता, कंत्राटी कामगारांचा वेळेवर पगार, अशा विविध समस्यांविषयीच्या तक्रारींचा पाढा सफाई आणि कंत्राटी कर्मचार्यांनी राज्य सफाई कर्मचारी आयोगासमोर वाचला. त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई, कंत्राटी कर्मचार्यांचे प्रश्न तातडीने सोडवा, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
महापालिकेच्या सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी सोमवारी महापालिकेत बैठक आयोजित केली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे संदीप कदम यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि सफाई कर्मचारी समन्वय समिती व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचार्यांच्या विविध अडीअडचणी आणि मागण्या या वेळी आयोगासमोर मांडण्यात आल्या. यामध्ये 2012 साली बंद झालेली सफाई कर्मचार्यांची श्रमसाफल्य योजना पुन्हा सुरू करावी, महर्षी वाल्मीकी पुरस्कार पुन्हा सुरू करावा, जेटिंग मशिनच्या गाड्यांसाठी काढलेल्या टेंडरची माहिती द्यावी, सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शन व अनुकंपा यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, ती निकाली काढावीत, सफाई कर्मचार्यांना अपघात विमा योजनेचे कार्ड वाटप करावे, 2005 नंतर कामाला लागलेल्या सफाई कर्मचार्यांना अंशदायी वैद्यकीय योजना लागू करावी, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.
या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना डागोर यांनी केल्या. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन करेल, असे आश्वासन दिले.