चहाचे कप उचलणारे हात पुन्हा उंचावणार प्रो-कबड्डीची ट्रॉफी; स्टार कबड्डीपटू इनामदारचा खडतर प्रवास Pudhari
पुणे

Aslam Inamdar: चहाचे कप उचलणारे हात पुन्हा उंचावणार प्रो-कबड्डीची ट्रॉफी; स्टार कबड्डीपटू इनामदारचा खडतर प्रवास

2021 ला केले खेळात पदार्पण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘पुणेरी पलटण’चा स्टार कबड्डीपटू अस्लम इनामदार याच्यासाठी कबड्डी हा खेळ जीवनाला कलाटणी देणारा ठरला. कधी काळी उपजीविकेसाठी चहाच्या टपरीवर काचेचे ग्लास उचलून ते धुण्यासाठी आईला मदत करणारे अस्लमचे हात प्रो-कबड्डी लीग (पीकेएल) च्या 10 व्या सत्रात ट्रॉफी उंचावू शकले. कबड्डी खेळण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम अन् सातत्य याच्या जोरावर सुरू असलेला अस्लमचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची एक कहाणी आहे.

अस्लमची कबड्डीची आवड त्याचा भाऊ वसीम आणि स्थानिक कबड्डीचे प्रशिक्षक राहुल बालकर यांनी ओळखली. जरी अनेक वर्षे नाव किंवा पैसा न मिळाल्यामुळे तो अज्ञात राहिला असला, तरी आता मिळवत असलेले यश मोठे आहे. 10 वर्षे फक्त एक कबड्डीपटू होता. ना पैसा, ना प्रसिद्धी तरी 2019 मध्ये अस्लमच्या कारकिर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. (Latest Pune News)

2021 मध्ये त्याने पुणेरी पलटणकडून पीकेएलमध्ये पदार्पण केले आणि लवकरच एक धडाडीचा रेडर म्हणून त्याने नाव कमावले. मात्र यशासोबतच अडथळेही आले. 10 व्या सत्रात ‘पुणेरी पलटण’ ला त्यांच्या पहिल्या विजेतेपदापर्यंत नेताना कर्णधार आणि ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ ठरलेल्या अस्लमला 11 व्या सत्रात गंभीर दुखापत झाली. पुनरागमनाबाबत शंका व्यक्त होऊ लागल्या होत्या. मात्र आता 12 व्या सत्रासाठी अस्लम नव्या जोमाने सज्ज झाला आहे.

याबाबत बोलताना अस्लम म्हणाला, ‘माझ्या बालपणीचा काळ अतिशय कठीण होता. त्या काळात ‘आमच्या घरातील कुणीही उपाशी राहू नये,’ हेच एक आमचे उद्दिष्ट होते. आणि केवळ त्यासाठीच आम्ही हॉटेलमध्ये, शेतात जेथे कुठे काम मिळेल, तिथे कष्ट करत राहिलो आणि त्यातून उपजीविका करत राहिलो. पोटासाठीची ही लढाई सुरू असतानाच उराशी कवटाळलेले कबड्डीचे स्वप्न कधीही दृष्टिआड होऊ दिले नाही. जिथे मिळेल, तिथे ती आवड जोपासत राहिलो आणि खेळत राहिलो.

‘पीकेएल’ने खेळाचे स्वरूपच बदलले!

अस्लम म्हणतो, ‘पीकेएल’ने फक्त खेळाडूंचेच नाही, तर संपूर्ण खेळाचेच स्वरूप बदलले आहे. जर एखाद्या पीकेएल खेळाडूने सलग तीन-चार हंगाम खेळले, तरी त्याचे आयुष्यच बदलून जाते. खेळाडूच्या आयुष्यात सातत्य हीच खरी परीक्षा आहे. यश मिळवणं सोपे आहे ते टिकवणे सगळ्यात कठीण आहे. अनेक खेळाडू एक वर्ष चमकतात आणि निघून जातात. माझ्यासाठी हे फक्त मेहनत नव्हे, तर स्मार्टवर्कही आहे. खेळातील वाढत्या प्राविण्याचे श्रेय अस्लम पुणेरी पलटणच्या यंत्रणेला आणि मार्गदर्शक अशोक शिंदे यांनाच आहे.

प्रत्येक खेळाडूला शेकडो लोक सल्ला देतात; पण आयुष्यात एक अशी व्यक्ती असते की, ज्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि त्या विश्वासावरच तो खेळाडू यशाची शिखरे पादाक्रांत करतो. माझ्यासाठी अशोक सर अशा विश्वासार्ह व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी मला नेहमी सांगितले, मी तुला सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू बनवणार आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवत अद्याप कार्यरत आहे.
- अस्लम इनामदार, कबड्डीपटू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT