पुणे

पिंपरी : बटाट्याची आवक घटूनही किरकोळ बाजारात दर नियंत्रणात

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  उपबाजारामध्ये कांदा आणि कोबीची आवक वाढली आहे. कांद्याच्या घाऊक दरात क्विंटलमागे 50, तर कोबीच्या दरामध्ये क्विंटलमागे 150 रुपयांची घट झाली आहे. बटाट्याची आवक मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 145 क्विंटलने कमी झाली आहे. पिंपरी भाजी मंडई येथे किरकोळ बाजारात कांदा आणि बटाटा यांचे दर नियंत्रणात होते. 16 ते 20 रुपये किलो या दराने त्यांची विक्री सुरू होती. त्या तुलनेत कोथिंबीरच्या दरात गड्डीमागे 10 रुपयांची वाढ झाली.

30 रुपये गड्डी या दराने कोथिंबीर विकली जात होती. त्याशिवाय, वाटाणा, घेवडा, शेवगा आदी भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. उन्हाच्या तडाख्यामुळे मालाची आवक कमी झाल्याने हा परिणाम झाला आहे. मोशी उपबाजारामध्ये रविवारी कांद्याची 508 क्विंटल तर, बटाट्याची 767 क्विंटल इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात कांद्याची 431 क्विंटल इतकीच आवक झाली होती. त्या तुलनेत रविवारी 77 क्विंटल इतकी वाढ झाली. तर, बटाट्याची आवक 145 क्विंटलने घटली आहे. टोमॅटो – 303 क्विंटल, फ्लॉवर – 252 क्विंटल, कोबी – 178 क्विंटल इतकी आवक मोशी उपबाजारात झाली आहे. एकूण 2 हजार 980 क्विंटल इतकी फळभाज्यांची तर, 23 हजार 400 गड्डी इतकी पालेभाज्यांची आवक झाली आहे.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT