Pune Municipal Corporation elections
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी लागणार्या ईव्हीएम मशिन यंत्राचा आणि मतदान केंद्रांचा आढावा घेऊन त्यांची संख्या निश्चित करा आणि त्यासंबंधीचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला दिले आहेत.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निश्चित केलेल्या मतदान केंद्रांची संख्या प्रमाण समजून त्यामध्ये 10 टक्के वाढ करून अंदाजित मतदान केंद्रांची संख्या निश्चित करावी, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गत आठवड्यात निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रभागरचना, गट, गण तयार करण्याचे निर्देश दिले होते.
आता निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्रत्येक महापालिकेला किती ईव्हीएम मशिन लागणार आहेत, याचा आढावा घेऊन त्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आयोगाने पुणे महापालिकेला पत्र पाठविले आहे.
त्यात निवडणुकांकरिता महापालिकडे उपलब्ध असलेली ईव्हीएम मशिनची संख्या विचारात घेऊन आणखी किती मतदान यंत्रांची आवश्यकता असेल, याचा आढावा घ्यावा, असे कळविले आहे. त्यासाठी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये निश्चित केलेल्या मतदान केंद्रांची संख्या प्रमाण समजून त्यामध्ये 10 टक्के वाढ करून अंदाजित मतदान केंद्रांची संख्या निश्चित करावी, अशा सूचना केल्या आहेत.
त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकांसाठी लागणार्या ईव्हीएम मशिन यंत्रांची संख्या निश्चित करून त्याचा अहवाल आयोगास सादर करावा. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगास नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय मतदान यंत्राच्या साठवणुकीसाठी व गोडाऊनच्या व्यवस्थापनासाठी तहसीलदार दर्जाच्या अधिकार्याची व पर्यवेक्षणासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
तसेच नव्याने खरेदी करण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या गोडाऊनमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का? याबाबतची माहिती घ्यावी. तसेच ईव्हीएम मशिन ठेवण्यासाठी गोडाऊनची जागा अपुरी असेल तर अन्य ठिकाणी सुरक्षित साठवणूक करण्यायोग्य मोठी जागा उपलब्ध करून घेण्याबाबत तजवीज ठेवावी व तसा अहवाल देखील सादर करावा, असे निवडणूक आयोगाकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.