खडकवासला धरणक्षेत्र वगळून इतरत्र 'मान्सूनपूर्व'च्या सरी; धरणसाखळीत केवळ 23.50 टक्के साठा Pudhari
पुणे

खडकवासला धरणक्षेत्र वगळून इतरत्र 'मान्सूनपूर्व'च्या सरी; धरणसाखळीत केवळ 23.50 टक्के साठा

शहरासह जिल्ह्यातून मागणी वाढल्याने वरसगावच्या विसर्गात वाढ

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरणसाखळी परिसर वगळता इतरत्र दररोज मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, धरणक्षेत्रात दोन दिवसांच्या हलक्या सरींचा अपवाद वगळता उघडीपच आहे. शुक्रवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 6.85 टीएमसी म्हणजे केवळ 23.50 टक्के साठा शिल्लक आहे.

पाण्याची मागणी वाढल्याने वरसगाव धरणाच्या विसर्गात 283 क्यूसेकने वाढ केली आहे. त्यामुळे सध्या वरसगाव धरणातून 883 क्यूसेक वेगाने तर पानशेतमधून 600 क्यूसेकने पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. सध्या जवळपास गतवर्षी इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)

गेल्यावर्षी आजच्या दिवशी म्हणजे 16 मे 2024 रोजी धरणसाखळीत 6.65 टीएमसी म्हणजे 22.81 टक्के पाणी होते. गुरुवारी (दि. 15) खडकवासलात एक मिलिमीटर पाऊस पडला तर बुधवारी (दि.14) पानशेतमध्ये 15 मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर मात्र धरण क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. अवकाळी पावसामुळे धरणक्षेत्रात गारवा निर्माण झाला आहे.

त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी आहे. त्याचा थोडा फार लाभ पुणेकरांना मिळणार आहे. दौंड, हवेली, इंदापूरसह जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाचे अखेरचे धरणातून पाणी सोडले जात आहे. तसेच, पुणे शहर व परिसराला पिण्यासाठी मागणीप्रमाणे पाणी सोडले जात आहे.

त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणाच्या पाणी पातळीत वेगाने घट सुरू आहे. पानशेत धरणाची पाणी पातळी 20 टक्क्यांवर तर वरसगावची पातळी 25 टक्क्यांवर गेल्याने धरणांतील बहुतांश पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गाळ, मातीचे ढीग दिसत आहेत.

पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चांगला पाऊस सुरू न झाल्यास पुणेकरांसह परिसरातील एक कोटी नागरिकांवर पाणी कपातीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

धरणसाखळीतील टेमघर धरण जवळपास कोरडे ठणठणीत पडले आहे. टेमघरमध्ये 8.76 टक्के, पानशेतमध्ये 2.19 टीएमसी म्हणजे 20.56 टक्के तर वरसगावमध्ये 3.26 टीएमसी म्हणजे 25.46 टक्के पाणी आहे. तर खडकवासला धरणात 1.07 टीएमसी म्हणजे 54.39 टक्के पाणी शिल्लक आहे.

पानशेत व वरसगाव धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर खडकवासलाची पाणी पातळी कमी - जादा होत आहे. खडकवासलातून शेतीसाठी मुठा कालव्यात एक हजार 148 क्युसेक तर पुणे शहर व परिसरासाठी जवळपास 400 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

खडकवासला धरणक्षेत्र वगळता इतरत्र दररोज अवकाळी पाऊस पडत आहे. त्या तुलनेत धरणक्षेत्रात कमी पाऊस पडत आहे. आज दिवसभर चारही धरणक्षेत्रांत पावसाने हुलकावणी दिली. खडकवासलाची पाणीपातळी 0.86 टीएमसी म्हणजे 43.34 टक्क्यांवर आहे.
- अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT