पुणे: मराठा समाजासाठी सरकारने सारथीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्यामार्फत मराठा, कुणबीसह त्याच्या उपजाती असलेल्या मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या जातींना लाभ देण्यास सुरुवात केली.
त्यातून सरकारला मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे मान्य आहे. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीत स्थान मिळत नाही. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रतिपादन संभाजी बिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. (Latest Pune News)
गायकवाड म्हणाले, राज्यात प्रादेशिक अस्मितांपेक्षा जातीय अस्मिता तीव झाल्या आहेत. आरक्षणाने मराठा समाजाच्या समस्या सुटू शकत नाहीत. खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर आरक्षणाचे औचित्यच संपून जाईल.
सरकारचे डोके ठिकाणावर नाही, कारण सरकारने एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. सरकारचे जे आरक्षण धोरण आहे त्याला मर्यादा आहेत, हे सरकारने मान्य केले पाहिजे. अन्य पर्याय शोधत सरकारने आता सत्य बोलणे आवश्यक आहे. शिक्षण आणि नोकरी आवाक्याबाहेर केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर केवळ आरक्षण हे उत्तर आहे, असे मला वाटत नाही.
पुढील गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षणाचा खर्च सहा ते आठ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे. सरकारने दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसी स्टेटस देते, मात्र मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश देत नाही. आता कोर्टात जीआर टिकतो का, ते पाहावे लागेल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा
आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. एसटी, एससी, ओबीसी, खुल्या गटाने एकत्र येत महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. सध्याच्या नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत आहे. नेत्यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवू नये.
आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रम घेणार आहोत. त्या पार्श्वभूमिवर 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे महाराष्ट्र धर्मासाठी या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड, डॉ. दीपक पवार, डॉ. श्रीराम पवार, लेखक डॉ. प्रकाश पवार, हनुमंत पवार, बालाजी गाडे-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी रिक्षा पंचायतचे नितीन पवार, कॉ. किशोर ढमाले यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.